स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये (Davos) 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' (World Economic Forum) पहिल्याच दिवस महाराष्ट्राने गाजवला. राज्यामध्ये सुमारे 45900 कोटींचे गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या दिवशी विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहे. नव्या गुंतवणूक प्रकल्पांमुळे राज्यातील किमान दहा हजार तरूणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी सांगितली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
सामंत म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.
पहिल्या दिवशी पाच कंपन्यांसमवेत राज्य सरकारचे सामंजस्य करार करण्यात आले. यात Greenko energy Projects Pvt.Ltd या कंपनीने 12000 कोटींची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे. याशिवाय जागतिक पातळीवरील नावाजलेले गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या Berkshire Hathaway Home Services Orenda India या कंपनीने 16000 कोटींची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. ICP Investments/ Indus Capital या कंपनीकडून 16000 कोटींची गुंतवणूक होणार असून Rukhi foods कंपनीची 250 कोटींची गुंतवणूक होणार आहे. Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. ने 1650 कोटींचा गुंतवणूक करार केला आहे.