जगभरात महागाई आणि मंदीचा प्रभाव वाढत असताना भारतात मात्र नेमकं उलटे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतात वाहन विक्रीने आजवरचा रेकॉर्ड मोडला होता. आता ऑटो इंडस्ट्रीमधून आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. भारतात सुपर लक्झरी कारच्या विक्रीत तब्बल 50% वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील अति श्रीमंत वर्गसुद्धा वाहन खरेदीत आघाडीवर असल्याचे सुपर कारच्या आकडेवारीने अधोरेखीत केले.
किमान दोन कोटी रुपये किंमत असणाऱ्या मोटारी या लक्झरी आणि सुपर लक्झरी कार या श्रेणीत मोडतात. चालू वर्षात (2022) मध्ये 450 लक्झरी मोटारींची विक्री होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर्ष 2021 ची तुलना केली तर ही विक्री 50% नी अधिक असण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये 300 लक्झरी कार्सची विक्री झाली होती तर कोव्हीडपूर्व म्हणजे 2018 मध्ये सर्वाधिक 325 लक्झरी कार्सची विक्री झाली होती.
भारतात कोट्यधीश उद्योजक, स्टार्टअप्स (मिलेनिअर्स आणि बिलेनिअर्स) यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांचे राहणीमान पाहता या गटाकडून हायएंड लक्झरी कार्सला पसंती दिली जात आहे. त्यामुळे या कारची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या विक्रीमध्ये वर्ष 2022 मध्ये वाढ झाली आहे.लक्झरी कारची मागणी केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेली नाही. द्वितीय आणि तृतीय स्तरातील शहरांत देखील लक्झरी कार्सला मागणी असल्याचे दिसून आले आहे.
तरुणाईमध्ये लक्झरी कार्सची क्रेझ
लॅम्बॉर्गिनी, फेरारी, अॅश्टॉन मार्टिन, बीएमडब्ल्यू, बेंटले, पोर्शे आणि मेबॅच या इंटरनॅशनल ब्रॅंड्सच्या गाड्या इथल्या कोट्याधीश भारतीयांना आकर्षित करत आहेत. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठल्यानंतर लक्झरी कार्सच्या विक्रीने टॉपगिअर टाकला आहे. नव्या दमाचे तरुण उद्योजक अल्ट्रा लक्झरी कार्सला पसंती देत आहेत. त्यामुळे या श्रेणीतील मोटारींना जबरदस्त मागणी असल्याचे लॅम्बॉर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अगरवाल यांनी सांगितले. लॅम्बॉर्गिनीची कारची किंमत किमान 4 कोटींपासून सुरु होते.