Mumbai Ahmadabad High Speed Railway: बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचं कंत्राट एल अँड टी कंपनीच्या पदरात पडलं आहे. High-Speed Rail Corporation Limited (NHSRCL) कडून या कामाचे कंत्राट काढण्यात आले होते. दरम्यान, पुढील काही दिवसांत L&T कंपनी काम सुरू करेल. या मेगा प्रोजेक्टमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद जवळ येणार आहेत.
508 किलोमीटर लांबीचा एकूण प्रकल्प
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गाचे एकूण अंतर सुमारे 508 किलोमीटर आहे. यापैकी 135.45 किलोमीटर मार्ग तयार करण्याचे काम कंपनीला मिळाले आहे. एल अँड टी कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली. या कंत्राटाअतंर्गत रेल्वे मार्ग, पूल, स्टेशन, मोठ्या नद्यांवरील पूल, डिपॉट, भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद अंतर 2 तासात पूर्ण होणार
508 किलोमीटर मार्गापैकी 155.76 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रात येतो. 4.3 KM दादरा नगर हवेली आणि 348 कि.मी मार्ग गुजरातमध्ये येतो. संपूर्ण मार्गावर 12 स्टेशन आहेत. (Mumbai Ahmadabad High Speed Railway) या हाय स्पीड रेल्वेचा ताशी वेग 320 किलोमीटर असेल. रेल्वे काही ठराविक स्टेशनवर थांबल्यास अहमदाबाद-मुंबई अंतर 2 तासात कापता येईल. तर सर्व स्टेशनवर गाडी थांबल्यास 3 तासात संपूर्ण कापेल.
लार्सन अँड टुब्रो ही 23 बिलियन डॉलर मूल्य असलेली इंजिनिअरिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी आहे. अवजड प्रकल्प निर्मितीसह इतरही अनेक क्षेत्रात कंपनीने पाय रोवले आहेत. (Mumbai Ahmadabad Railway contract to L&T) 50 पेक्षा जास्त देशात कंपनी कार्यरत आहे. एल अँड टी ने दिलेल्या माहितीनुसार 5 हजार कोटींपुढील कंत्राटे मेगा ऑर्डर श्रेणीत येतात.
उत्तर प्रदेश सरकारचे कंत्राटही मिळाले
नुकतेच एल अँड टी कंपनीला उत्तर प्रदेश सरकारचे पाणी पुरवठा योजनेचे मोठे कंत्राट मिळाले आहे. याअंतर्गत बलिया आणि फिरोजाबाद जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार आहे. या कंत्राटाअंतर्गत अनेक छोट्यामोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. पाणी शुद्धीकरण आणि पुरवठा प्रकल्पाचे हे कंत्राट सुद्धा मेगा प्रोजेक्ट श्रेणीतील आहे. म्हणजेच या कंत्राटाचे मूल्यही अडीच हजार ते पाच हजार कोटींच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.