सध्या विविध सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात अमेरिका, ऑस्ट्रेलियातीन अनिवासी भारतीय तांदूळ खरेदी (Rice Buying) करताना आढळून येत आहेत. तांदळाच्या किंमती वाढण्याच्या भीतीनं घरात साठा करण्याची लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे इथल्या स्टोअर्सनी या परिस्थितीचा फायदा उठवत अव्वाच्या सव्वा किंमती वाढवूनदेखील ठेवल्या आहेत. आशियायी तसंच आफ्रिकी नागरिकांच्या जेवणात तांदूळ हा एक प्रमुख घटक आहे.
तांदळाचं उत्पादन झालं कमी
मागच्या वर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण झाले. गव्हाच्या किंमतीत अचानक वाढ झाली. त्यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमतीदेखील गगनाला भिडल्या. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत किंमती नियंत्रित राहण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आताची परिस्थिती पाहता अतिवृष्टी, एल निनो या सर्व बाबी तांदळाच्या उत्पादनावर करणाऱ्या आहेत.
किंमतींवर मोठा परिणाम
नुकतीच सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सहाजिकच यामुळे तांदळाच्या किंमतींवर मोठा परिणाम होणार आहे. भारतात तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. जगाच्या 40 टक्क्यांपर्यंतचं उत्पादन भारतात होतं. आता तांदळाच्या निर्यातबंदीमुळे इतर देशांतल्या भारतीयांची अडचण झाली आहे. तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी अडचणी लक्षात घेता निर्यातबंदी भारतानं उठवावी, अशी मागणी होत आहे.
निर्यातबंदी उठवण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे ऑलिव्हियर गौरींचास यांनी भारतानं निर्यातबंदी उठवावी, अशी विनंती केली आहे. या निर्यातबंदीमुळे जगभर तांदळाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तसंच किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. या निर्णयामुळे एकूण निर्यातीवर जवळपास 25 टक्क्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तो आत्ताच दिसायला लागला आहे. म्हणूनच विदेशात असणारे भारतीय तांदूळ खरेदी आणि साठवणुकीसाठी दुकानांबाहेर रांगा लावत आहेत.