Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC MF-IDBI MF merger : एलआयसी-आयडीबीआय म्युच्युअल फंड प्रस्तावित विलीनीकरण लवकरच, ग्राहकांना फायदा होणार?

LIC MF-IDBI MF merger :  एलआयसी-आयडीबीआय म्युच्युअल फंड प्रस्तावित विलीनीकरण लवकरच, ग्राहकांना फायदा होणार?

LIC MF-IDBI MF merger : एलआयसी म्युच्युअल फंड आणि आयडीबीआय म्युच्युअल फंड यांच्यातलं प्रस्तावित विलीनीकरण लवकरच होणार आहे. ते या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होतेय. फेअर ट्रेड रेग्युलेटर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं (CCI) एलआयसी म्युच्युअल फंड (LIC MF) आणि आयडीबीआय (IDBI MF) यांच्या अधिग्रहणास या मार्च महिन्यातच मान्यता दिलीय.

एलआयसी ही सरकारी विमा कंपनी आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) एलआयसी म्युच्युअल फंडाची (LIC MF) प्रायोजक आहे, तर आयडीबीआय बँक आयडीबीआय म्युच्युअल फंडाची प्रायोजक आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी टीएस रामकृष्णन यांनी या प्रस्तावित विलीनीकरणाबाबत माहिती दिली. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भात वृत्त दिलंय. प्रस्तावित विलीनीकरणाबाबत आम्ही नियामकाकडून येणाऱ्या अपडेट्सची वाट पाहत आहोत. त्यानंतर आयडीबीआय आणि आम्हाला गुंतवणूकदारांना एक महिन्याची एक्झिट नोटीस द्यावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या तर जून किंवा जुलैच्या शेवटी विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत हे व्हावं, असं ते म्हणाले.

ग्राहकांच्या फायद्याचा विचार

विलीनीकरण ही एक मोठी प्रक्रिया आहे. अशा गोष्टी वेळेत घडल्यास ग्राहकांना फायदा होतो. त्यामुळे त्यासंदर्भात आम्ही काळजी घेत आहोत. तसंच सर्व नियमांचं पालन होईल, याकडे लक्ष देत असल्याचं रामकृष्णन म्हणाले. मागच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी एलआयसी म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालची मालमत्ता (AUM) सुमारे 17,600 कोटी रुपये इतकी होती. यापैकी ईटीएफ (ETF) इक्विटीसह इक्विटी 8,000 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं पाहायला मिळालं होतं. तर आयडीबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता (AUM) मागच्या वर्षाच्या अखेर 4,000 कोटी रुपयांच्या खाली होती.

व्यवसाय वाढवण्यावर भर

ज्या योजना सामान्यपणे ओळखल्या जाऊ शकतात त्यांचं विलीनीकरण केलं जाणार आहे. आयडीबीआयच्या काही योजना असतील ज्या आमच्याकडे नाहीत, त्या आम्ही स्वतंत्र योजना म्हणून चालवू, असं त्यांनी सांगितलंय. एलआयसी म्युच्युअल फंडासाठी त्याच्या एयूएममध्ये एसआयपीचं योगदान सध्या सुमारे 13 टक्के इतकं आहे. म्युच्युअल फंड हाऊस आता हाच हिस्सा वाढवण्यावर भर देणार आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षात या 13 टक्क्यांवरून ते 15-16 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाणार आहे. दरम्यान, एयूएमच्या बाबतीत सध्या एलआयसी म्युच्युअल फंडाचा बाजारातला हिस्सा 0.5 टक्क्यांच्या खाली आहे.

एलआयसी नेटवर्कचा फायदा

फंड हाउसचे बरेच वितरक एलआयसीचे एजंट आहेत. ती संख्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याचबरोबर कंपनी एलआयसी एजंट नसलेल्या वितरकांची संख्याही वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं. एलआयसीच्या एवढ्या मोठ्या नेटवर्कचा कसा फायदा घेणार, याविषयी विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली. एलआयसी म्युच्युअल फंडाचे जवळपास 45,000 वितरक आहेत. त्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त LIC एजंट आहेत. आम्ही आमचे वितरक म्हणून एलआयसी एजंट्सना भरती करण्याला प्राधान्य देत आहोत. मात्र म्युच्युअल फंड विकण्याचा अनुभव असणाऱ्या इतर वितरकांनाही संधी दिली जाईल, असं ते म्हणाले. म्युच्युअल फंड हाऊसचे सक्रिय वितरक सध्या सुमारे 7,000पर्यंत असू शकतात.

आयपीओचं नियोजन काय?

आयपीओविषयी विचारलं असता ते म्हणाले, की फंड हाउसमध्ये एलआयसीची हिस्सेदारी 45 टक्के आहे. म्युच्युअल फंड हाउस लगेच आयपीओ विचार करत नाही. सध्या त्याबद्दल आमच्याकडे कोणतीही योजना नाही. स्वतःला शेअर बाजारात लिस्टेड करण्याचा विचार करण्यापूर्वी आम्ही मजबूत होण्यावर अधिक लक्ष देत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलआयसी म्युच्युअल फंडाचे AUM सुमारे 27,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

गुंतवणूकदार आणि मालमत्ता

आर्थिक वर्ष 2022मध्ये एएमसीनं सर्व थेट योजनांमधून 89,485 कोटी रुपयांची एकूण विक्री जमवली होती. 31 मार्च 2022पर्यंत एकूण गुंतवणूकदारांची संख्या 5,49,971 इतकी होती. व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता (AAUM) 2021-22च्या शेवटच्या तिमाहीत 18,252 कोटी इतकी होती.