Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Investment: अदानीतील गुंतवणुकीवरुन टीकेची धनी ठरलेल्या LIC ने 'या' दहा कंपन्यांमधील हिस्सा वाढवला

LIC Investment

Image Source : www.ndtv.com

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) दहा कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला आहे. मागील काही दिवसांपूर्वी अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीवरुन LIC समूहावर टीका झाली होती. आता दहा बड्या कंपन्यांमध्ये LIC ने आपली गुंतवणूक वाढवली आहे.

LIC Investment: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) दहा कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत LIC ने खरेदी सुरू ठेवली आहे. अदानी समूहातील गुंतवणुकीवरुन LIC कंपनी टीकेची धनी ठरली होती. LIC चे शेअर्सही त्यामुळे काही प्रमाणात खाली आले होते. दरम्यान, अदानी समूहातील कंपनीची गुंतवणूक 1 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे LIC ने स्पष्ट केले होते. आता महिंद्रा, व्होलटास सह आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कंपनीने हिस्सा वाढवला आहे.

IRCTC आणि voltas मध्ये LIC ची गुंतवणूक

सरकारी मालकीच्या Indian Railway Catering And Tourism Corporation (IRCTC) मध्ये एलआयसीने आपला हिस्सा वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबर मध्ये IRCTC मध्ये LIC चा हिस्सा 4.44% होता. त्यामध्ये वाढ होऊन तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 7.42% झाला आहे. IRCTC ची बाजार भांडवल 51,984 कोटी आहे. तर शेअर्सची किंमत 650 च्या जवळपास आहे.

वोल्टास या टाटाच्या मालकीच्या कंपनीत एलआयसीची गुंतवणूक 9.88% इतकी झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत ही गुंतवणूक 8.24% इतकी होती. वोल्टास ही देशातील आघाडीची एअर कंडिशनर निर्मिती करणारी कंपनी असून कंपनीचे बाजार मूल्य 28,277 कोटी रुपये आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपन्यांत LIC ची गुंतवणूक

एम्फसिस या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीत LIC ने 2.1 टक्क्यांवरील हिस्सा वाढवत 3.66% इतका केला आहे. एम्फसिस या कंपनीचे बाजारमूल्य 42,129 कोटी रुपये असून शेअर्सची किंमत 2236.30 इतकी आहे. टेक महिंद्रा या माहिती तंत्रज्ञान कंपनीत LIC ने मोठ्या प्रमाणात हिस्सा वाढवला आहे. दुसऱ्या तिमाहीत फक्त 1.48% हिस्सा होता. त्यात वाढ करुन 7.44% हिस्सा ताब्यात घेतला आहे. सोबतच कॅप्री ग्लोबल कॅपिटल या कंपनीतील हिस्साही LIC ने वाढवला आहे.या सोबतच डॉ. रेड्डी लॅबोरेटरी, Welspun Corp,दिपक नायट्रेट (Deepak Nitrite), GAIL (India) आणि HDFC AMC मधील गुंतवणूक वाढवली आहे. 

अदानी समूहामध्ये LIC ने केलेल्या गुंतवणुकीवरुन बरीच टीका झाली होती. मात्र, एलआयसीने सर्व आरोप फेटाळून लावले. कंपनीने एक प्रसिद्धीपत्रकच जारी केले होते. त्यात असं म्हटलं होतं की, अदानी समूहामध्ये केलेली गुंतवणूक LIC च्या एकूण गुंतवणुकीच्या 1% पेक्षाही कमी आहे. तसेच गुंतवणुकदारांना कोणताही धोका नाही. केंद्र सरकारनेही LIC ची बाजू घेत सारवासारव केली होती. अदानी समूहाचे शेअर्स ढासळल्यानंतर LIC चे शेअर्सही खाली आले होते.