आपल्या गावी किंवा पर्यटनाला बाहेरगावी जाण्यासाठी केंद्र सरकारकडून पगारदार कर्मचाऱ्यांना एलटीसी अर्थात लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशनची सुविधा वापरून भारतात कुठेही प्रवास करता येतो. LTC हा एक भत्ता आहे, जो वर्षातून एकदा रजेवर असताना कर्मचार्यांच्या प्रवासाच्या खर्चासाठी दिला जातो. हा भत्ता करमुक्त असल्याने, कंपनीने त्यावर टीडीएस कापण्याची गरज नसते. एलटीसीच्या नियमांनुसार भारतातील एका ठिकाणाहून देशातील दुसऱ्या ठिकाणी जर प्रवास केला तरच एलटीसीचा फायदा होऊ शकतो.
‘एलटीसी’चे प्रवासादरम्यानचे नियम (Rule of LTC While Travelling)
- • बस, ट्रेन किंवा विमानाने प्रवास केल्याच्या खर्चावर LTC मिळू शकतो.
- • विमान प्रवास असेल तर क्लासनुसार भाडे आकारले जाऊ शकते आणि कर्मचारी त्यासाठी दावा करू शकतो.
- • ट्रेनचा प्रवास असेल तर फर्स्ट क्लास किंवा एसी कंपार्टमेंटनुसार एलटीसी अंतर्गत दर आकारला जाऊ शकतो.
- • जर कोणतेही खासगी वाहन असेल तर कर्मचारी रेल्वेच्या एसी कंपार्टमेंटच्या खर्चानुसार समान रक्कमेचा दावा करू शकतो.
- •प्रवासादरम्यान वापरलेले खासगी वाहन, कार बाईक, हॉटेलचा किंवा खाण्याचा खर्च तसेच शॉपिंगचा खर्च LTC मध्ये ग्राह्य धरला जात नाही.
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 192 (1) नुसार असे सांगण्यात आले आहे की, कंपनीने कर्मचार्यांना पगार देण्यापूर्वी टीडीएस कापला पाहिजे. तसेच कलम 10(5) अंतर्गत असे नमूद करण्यात आले आहे की, कर्मचार्यांना एलटीसी अर्थात कंपनीच्या खर्चाचा एक घटक म्हणून केलेल्या पेमेंटला कर आकारणीतून सूट देण्यात यावी.
एलटीसीचे फॅमिली ट्रिपचे नियम (Rule of LTC for Family Trip)
- • पगारदार कर्मचाऱ्याशिवाय फक्त कुटुंबीय ट्रीपला जाऊ शकत नाहीत.
- • ट्रिपमध्ये कर्मचाऱ्याचे आई-वडील, पत्नी, मुलं, भाऊ-बहीण यांचा समावेश ग्राह्य धरला जाईल.
- • जर पती-पत्नी दोघेही पगारदार असतील तर एकाच ट्रिपसाठी एलटीसी लागू होणार नाही.
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निकालात अधोरेखित केले आहे की, LTC फक्त भारतातील प्रवासावरच दिली जाऊ शकते. सहलीमध्ये परदेशातील प्रवास समाविष्ट असेल तर कंपनीने पगारातील टीडीएस कापला पाहिजे. म्हणूनच, एलटीसीच्या सुविधेचा लाभ घेऊन परदेशात जायचं असेल, तर मात्र पगारदार कर्मचाऱ्यांना टीडीएस अर्थात टॅक्स डिडक्टेट सोर्स टाळता येणार नाही.