भारतात जसे ग्रामीण भागातून महानगरांत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तशीच काहीशी अवस्था जपानमध्ये दिसून येत आहे तिथेही ग्रामीण किंवा देशातील इतर भागातून महानगरांमध्ये येणाऱ्या लोकांचा लोंढा थांबवण्यासाठी आणि इथल्या पायाभूत सोयीसुविधांवरील ताण कमी करण्यासाठी जपान सरकारने महानगरातून बाहेर पडणाऱ्या कुटुंबांसाठी आर्थिक सहाय्याची योजना आणली आहे.
जपान सरकारने महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी महानगरे आणि शहरांपासून लांब जाणाऱ्या कुटुंबांसाठी 2023 साठी नवीन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शहर किंवा महानगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना देशातील उतर भागात राहण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना एप्रिल 2023 पासून लागू केली जाण्याची शक्यता आहे.
या योजनेंतर्गत टोकोओ मेट्रोपॉलिटन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या पात्र कुटुंबांना प्रत्येक मुलामागे 1 दशलक्ष येन, म्हणजे 7,700 अमेरिकन डॉलर दिले जाणार आहेत. भारतीय चलनात सांगायचे झाले तर, या कुटुंबांना शहरापासून लांब राहण्यासाठी प्रत्येक मुलामागे किमान 6.37 लाख रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वीही म्हणजे 2019 मध्ये जपान सरकारने अशाप्रकारची योजना आणण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी त्यावेळच्या योजनेपेक्षा अधिक रक्कम दिली जाणार आहे.
सध्या जपानमध्ये जन्मदराचे प्रमाण खूपच कमी झाले आहे आणि त्या तुलनेत दीर्घ आयुर्मानाचे प्रमाण वाढत असल्यामळे जपानला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. तर शहरांमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यावर उपाय म्हणून जपान सरकार ही योजना राबवण्याचा विचार करत आहे.
जपान सरकारने ही योजना आणताना स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबात एक मूल असेल तर त्या एका मुलामागे 1 दशलक्ष येन तर दोन मुले असलेल्या कुटुंबाला 3 दशलक्ष येन देण्याचा प्रस्ताव आणला आहे. टोकिओ शहरातील मध्य भागात म्हणजेच मेट्रोपॉलिटन भागात पाच वर्षांपासून राहणारी कुटुंबे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अशा कुटुंबातील कमावत्या व्यक्ती कंपनीकडून वर्क-फ्रॉम होम किंवा इतर पर्यायांचा वापर करू शकतात. तसेच जे इतर उद्योग-धंद्यांमध्ये आहेत. त्यांनाही नोकरी किंवा धंद्यासाठी मदत केली जाणार आहे. 2019 मध्ये फक्त 71 कुटुंबापासून सुरु झालेल्या या योजनेचा 2021 मध्ये फक्त 1 कुटुंबाने लाभ घेतला आहे.