इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना एकाच आठवड्यात दोन वेळा कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवले आहे. ललित मोदी हे सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. के.के. मोदी फॅमिली ट्रस्टचा वाद सुरू असताना ललित मोदी यांच्या संपत्तीचे वारसदार कोण असेल यावर वाद सुरू होते. अशातच ललित मोदी यांची तब्येत बिघडली असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे.
ललित मोदींची संपत्ती!
ललित मोदी यांनी त्यांचा मुलगा रुचिर मोदी याला आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले आहे. रुचिर मोदी हा ललित मोदींचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या नावे 4555 कोटी रुपयांची संपत्ती ललित मोदींनी केली आहे. काल सोशल मीडियावर ललित मोदींनी ही घोषणा केली. त्यांची मुलगी आलिया हिच्याशी संपत्ती वाटपाची चर्चा केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे.
ललित मोदी यांच्या कुटुंबात संपत्तीवर वाद सुरू होते. ललित मोदी यांचा त्यांच्या आई बिना मोदी, बहीण चारू मोदी यांच्याशी संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद सुप्रीम कोर्टात देखील पोहोचला होता. परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा असे न्यायालयाने मोदी कुटुंबाला सुचवले होते. परंतु यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याचे ललित मोदी म्हणाले आहेत. "माझ्या आईशी आणि बहिणीशी चर्चेच्या अनेक फैऱ्या झडल्या आहेत. कोर्टात सुरू असलेला खटला कंटाळवाणा आणि कठीण आहे, याचा शेवट होताना दिसत नाहीये. यामुळे मला त्रास होत असून हा निर्णय घेत आहे" असे ललित मोदी म्हणाले आहेत.
कोण आहेत रुचिर मोदी?
ललित मोदी यांचे एकुलते एक सुपुत्र असलेले रुचिर हे 28 वर्षीय आहेत. रुचिर हे मोदी व्हेंचरचे संस्थापक आहेत. सोबतच मोदी एंटरप्राइजेस, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लि., मोदी केयर आणि केके मोदी ग्रुपचे संचालक म्हणून देखील ते जबाबदारी सांभाळत आहेत. रुचिर यांनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.