Krishna Janmashtami Idol Price : सण-वार सुरु झाल्याने मार्केटमध्ये प्रचंड रेलचेल दिसुन येत आहे. राधा-कृष्ण, गणपती, दुर्गादेवी, शारदा देवी, महालक्ष्मी या देवतांच्या मूर्तींनी बाजारपेठ सजली आहे. यासोबतच देवांचे वस्त्र, गळ्यात घालायच्या माळा, कृष्णाची मुरली आणि पाळणा यासह इतर सजावटीच्या वस्तुंमुळे बाजाराची शोभा वाढली आहे. सर्वत्र विविध वस्तू खरेदी करण्या करिता ग्राहकांची गर्दी दिसुन येत आहे. दरम्यान जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आपण नागपुरातील मूर्तीकारांच्या व्यवसायाचा आढावा घेऊयात..
Table of contents [Show]
वर्षभर चालते काम
राजेश सदाशिवराव रामगुंडेवार हे चितारओळीत स्वत:चा वडिलोपार्जित व्यवसाय करतात. त्यांच्याकडे वर्षभर मूर्ती तयार करणे आणि त्यांची सजावट करणे हे कार्य सतत सुरु असते. राधा-कृष्ण, गणपती, दुर्गादेवी, गणपती, महालक्ष्मी, लक्ष्मीच्या मूर्ती यासारख्या विविध मूर्ती तयार करण्याचे काम ते वर्षभर करित असतात.
यंदा नफा होणार कमी
चंद्रपूर येथून माती आणून विविध मूर्ती तयार करण्याचे कार्य वर्षभर सुरु राहते. गेल्या दोन महिन्यांपासुन ते विविध मूर्ती तयार करण्याचे कार्य करित आहेत. त्यांच्याकडे 300 रुपयांपासुन ते 2500 रुपयांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जातात. प्रत्येक सणाला लागणाऱ्या मूर्तींकरीता राजेश यांची गुंतवणूक 1 ते 2 लाख रुपये असते. गेल्या वर्षी त्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या सणाला 1 लाख रुपये नफा झाला होता आणि 200 कृष्णमूर्तींची विक्री झाली होती. परंतु या वर्षी मूर्ती विकणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने आणि स्पर्धा वाढल्याने कृष्ण मूर्तीची विक्री कमी झाल्याचे राजेश यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावेळी नफा देखील कमी होणार असल्याचे राजेश यांनी सांगितले.
गणेश मूर्तीचे ऑर्डर बुकिंग सुरु
मार्केटमध्ये स्पर्धा वाढल्याने आणि प्रत्येक चौकात मुर्ती विकायला असल्याने मूर्तींचेअतिरिक्त दर न वाढवता, कृष्णमूर्तींचे गेल्या वर्षीचेच दर कायम ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राजेश यांनी दिली. तसेच जन्माष्टमीनंतर गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यासाठी मूर्ती विक्रेते राजेश यांनी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करुन 250 गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. त्यापैकी काही मुर्तींचे ऑर्डर बुक झाले आहेत.
विविध वस्तुंनी सजली बाजारपेठ
तसेच 20 रुपयांपासुन ते 1000 रुपये पर्यंतचे श्री कृष्णाचे वस्त्रालंकार, विविध प्रकारचे रेडिमेड फुलांचे हार, कृष्ण जन्माचे पाळणे आणि बासरी तसेच विविध सजावटीच्या वस्तुंनी बाजारपेठ सजली आहे. जन्माष्टमी निमित्त नागरिकांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.