काही वर्षापर्यंत अनेकजण एफडी, सोने अथवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देताना दिसत असे. मात्र, आता गुंतवणुकीचा ट्रेंड बदलताना पाहायला मिळतोय. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
प्रामुख्याने महिला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. एसआयपीच्या माध्यमातून (Systematic Investment Plans) गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या लेखातून महिलाद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देण्यामागचे नक्की कारण काय आहे, ते समजून घेऊया.
गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडला प्राधान्य
तरुण महिलांकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. त्यातही 18 ते 26 या वयोगटातील जवळपास 66 टक्के महिला गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्सची निवड करत आहे. Nippon India Mutual Fund च्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
जवळपास 49 टक्के महिला एसआयपीच्या माध्यमातून तर 25 टक्के एसआयआपी व एकरकमी गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांचा कल म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीकडे अधिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांचा घरातील आर्थिक नियोजनातील व निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढलेला दिसून येत आहे. तसेच, महिलांकडून दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केली जात आहे.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढण्याचे हे आहे कारण
- दीर्घकालीन फायदा व्हावा यासाठी गुंतवणूक
- करात सवलत मिळावी हा उद्देश
- झटपट पैशात वाढ व्हावी हा गुंतवणुकी मागचा हेतू असतो.
- कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी.
- मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात आर्थिक आधार मिळावा या हेतून गुंतवणूक.
- निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात घालवता यावे यासाठी.
- घर, गाडी खरेदी करण्यासाठी गुंतवणूक.
असे विविध उद्देश समोर ठेवून महिलांकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय, प्रवास करता यावा, समाजातील स्थान वाढावे, इतर काही नवीन शिकण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने देखील गुंतवणूक केली जाते.
तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड निश्चितच एक चांगला पर्याय आहे. सोने, एफडीच्या तुलनेत म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीने दीर्घकालीन फायदा मिळतो. मात्र, यात नुकसान होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती घेणे कधीही योग्य ठरते.