Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेकडून नामांकन मिळालेल्या अजय बंगा यांच्याबद्दल, या 10 गोष्टी जाणून घ्या

Ajay Banga

Image Source : www.bloomberg.com

Know About Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी मास्टरकार्डचे माजी सीईओ 'अजय बंगा' यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) हे जूनमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची शिफारस अमेरिकेच्या जो बायडेन (joe biden) यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पुणे-खडकी येथे जन्मलेले अजय बंगा सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मास्टरकार्ड, सिटीग्रूप, पेप्सिको, नेस्ले यासारख्या मोठ्या खासगी कंपन्यांमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. वातावरण बदल आणि जागतिक स्तरावरील उपक्रमांसाठी निधी जमा करण्याची क्षमता बंगा यांच्यामध्ये असल्यामुळे बायडेन प्रशासनाने त्यांच्या नावाची शिफारस केली.

जर जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून ‘अजय बंगा’ या नावाला मान्यता मिळाली, तर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकाच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती पदभार सांभाळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.बायडेन यांच्या शिफारशीनंतर अजय बंगा चांगलेच चर्चेत आलेत. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

अजय बंगा यांच्याबद्दल या 10 गोष्टी जाणून घ्या 

About Ajay Banga
  • अमेरिकन नागरिक असलेले अजय बंगा यांचा महाराष्ट्रामधील पुण्यात 10 नोव्हेंबर 1959 साली जन्म झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधरचे. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा यांनी भारतीय लष्करात सेवा बजावली असून ते लेफ्टनंट जनरल म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
  • बंगांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद येथे पूर्ण झाले. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून (St. Stephen's College, University of Delhi) त्यांनी अर्थशास्त्र विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts) ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी आयआयएम (IIM) अहमदाबादमध्ये व्यवस्थापन (Managment) विषयात पीजीपी (Equivalent to MBA) पदवी प्राप्त केली.
  • जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदासाठी बंगा हे पहिले भारतीय वंशाचे उमेदवार आहेत. त्यांची नियुक्ती झाल्यास ते डेव्हिड मालपास  (David Malpass) यांच्यानंतर कार्यभार सांभाळतील. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकाळात डेव्हिड मालपास यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ते जूनमध्ये या पदावरून पायउतार होणार आहेत. 

    जागतिक बँकेच्या 2021 च्या वार्षिक अहवालानुसार, डेव्हिड मालपास यांची नेट सॅलरी $525,000 इतकी, म्हणजे भारतीय चलनानुसार 4,34,52,937 रुपये आहे. याशिवाय बँकेने पेन्शन योजना आणि इतर फायद्यांसाठी वार्षिक योगदानामध्ये $340,000 पेक्षा जास्त रक्कम, म्हणजे भारतीय चलनात 2,81,40,950 रुपये ठेवले आहेत. तसेच  पदावरून पायउतार झाल्यानंतर मालपास यांना पगाराच्या 70 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकते. 
  • अजय बंगा सध्या खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिकचे (General Atlantic) उपाध्यक्ष आहेत. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक कामाचा तगडा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी मास्टरकार्ड, अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स अँड डाऊ इंकच्या बोर्डमध्ये विविध भूमिका बजावल्या आहेत. याशिवाय सिटी ग्रुप, पेप्सिको आणि नेस्ले या मोठ्या उद्योग समुहामध्येही त्यांनी काम केले आहे.
  • गेली 12 वर्ष ते मास्टरकार्डचे सीईओ (CEO of Mastercard) म्हणून काम करत होते. डिसेंबर 2021 मध्ये ते मास्टरकार्डमधून निवृत्त झाले. बंगा यांच्या कार्यकाळात, कंपनीने 2025 पर्यंत 1 अब्ज लोकांना आणि 50 दशलक्ष सूक्ष्म आणि लघु व्यवसायांना डिजिटल अर्थव्यवस्थेत आणण्याचे ध्येय ठेवले होते.
  • बंगा यांना यूएस सरकारसोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये, त्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (President Barack Obama) यांनी व्यापार धोरण आणि वाटाघाटींसाठी अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांना नियुक्त केले होते.
  • अजय बंगा हे मध्य अमेरिकेसाठी खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या युतीकरिता पार्टनरशिप व सह-अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. जिथे त्यांनी सार्वजनिक, खासगी आणि ना-नफा संसाधनांना एकत्र आणण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांच्यासोबत काम केले आहे. याशिवाय भारतात वाढलेल्या बंगा यांना विकसनशील देशांसमोरील आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अध्यक्ष झाल्यावर ते आपल्या निर्णयांमध्ये त्याचा वापर करू शकतात.
  • युनायटेड स्टेट्स मध्ये स्वतःच्या कामामुळे चर्चेत असलेला बंगा यांना भारतातही सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्रीने (Padma Shri) सन्मानित केले होते.
  • बिडेनच्या यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून बंगा यांच्या शिफारशी मागील उद्दिष्ट हे 189 राष्ट्रांच्या गरिबी निवारण संस्थेच्या केंद्रस्थानी हवामान बदल आणणे हा आहे. बंगा हे हवामान बदलाशी लढण्याच्या आव्हानांवर सार्वजनिकरित्या आपली चिंता व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. मास्टरकार्डमध्ये सीईओ म्हणून काम करत असताना 2020 मध्ये प्राइसलेस प्लॅनेट कोलिशन (Priceless Planet Coalition) तयार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये जवळपास 100 कंपन्यांना पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी कॉर्पोरेट गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी वचनबद्ध केले होते.
  • भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी बंगा हे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. 2019 मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, भारत-अमेरिका यांची धोरणात्मक भागीदारी ही जगाला आवश्यक असलेल्या "महागठबंधनापैकी" एक आहे. ही दोन महान राष्ट्र जगात सकारात्मक बदल घडवू शकतात. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi), बंगा यांनी 2014 मध्ये म्हटलं होतं की, ते भारताच्या विकासासाठी योग्य पावलं उचलत आहेत, त्यांनी कामाची नीट अंमलबजावणी केली, तर भारत एका वेगळ्या विकासाच्या मार्गावर नक्कीच जाईल. 

जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदी आजपर्यंत कोण कोण होतं?

list-of-world-bank-group-president.jpg