क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये यूजर्सची म्हणजेच गुंतवणूकदारांच्या आर्थिक सुरक्षिततेची चांगली काळजी घेतली जाते. क्रिप्टोमार्केटमधील अनेक नवनवीन संकल्पनांमुळे गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेला आणखी मजबुती मिळत आहे. क्रिप्टो व्यवहारातील डेव्हलपर्सनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेचे वेगवेगळे टप्पे रचले आहेत. या सुरक्षिततेतील शेवटचा टप्पा हा सीड फ्रेज (Seed Phrase) आहे. जर तुम्ही क्रिप्टो व्यवहार करताना अडचणीत आला आहात आणि यामुळे तुमचे फंडस् जाण्याची शक्यता असेल तर तुमच्याकडे शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे सीड फ्रेजचा. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हा हुकमी एक्का आणि हा एक्का कसे सगळे डाव पलटवू शकतो?
Table of contents [Show]
सीड फ्रेज म्हणजे काय? What is Seed Phrase?
क्रिप्टो वॉलेट (Crypto Wallet) तयार करताना गुंतवणूकदार किंवा युझर्स जेव्हा काही इनपूट्स देत असतात तेव्हा रॅण्डमली काही की-वर्डस् किंवा शब्द क्रिप्टो वॉलेटमध्ये तयार होत असतात. या की-वर्डसना सीड फ्रेज किंवा रिकव्हरी फ्रेज (Recovery Phrase) असे म्हटले जाते. या की-वर्डसचा वापर करून युझर्स त्याच्या फंडसचा अॅक्सेस पुन्हा मिळवू शकतो.
प्रायव्हेट की आणि सीड फ्रेज एकच आहेत का?
आता, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, सीड फ्रेज जर की-वर्डसच असतील तर मग त्या क्रिप्टो की (Crypto Key) मधील प्रायव्हेट की (Private Key) झाली ना? तर ते तसे नाही. प्रायव्हेट की हा एक अल्फान्युमॅरिक (Alphanumeric) पॅटर्न असतो. ज्याचा वापर करून युझर्स क्रिप्टोचे व्यवहार करतो आणि ते क्रिप्टो वॉलेटमध्ये स्टोअर केली जातात. प्रायव्हेट की आणि सीड फ्रेज (Private Keys & Seed Phrased) हे दोन्ही जरी वेगवेगळे असले, तरी त्यांना किती सुरक्षा द्यायची हे युझर्सच्या हातात असते. तसेच यासाठी हाय सिक्युरिटी द्यायलाच हवी. कारण या दोन्हीपैकी एकाही गोष्टीचा इतरांना अॅक्सेस मिळाला तर तुमच्या खात्यातून फंडस् जाण्याची शक्यता आहे.
सीड फ्रेजमध्ये 12 किंवा 24 शब्दांचा समावेश!
क्रिप्टो वॉलेट जरी एक वॉलेट असले तरी ते सामान्य वॉलेटप्रमाणे काम करत नाही. आपण आपल्या वॉलेटमध्ये जसे पैसे ठेवतो व काढतो, तितके सोपे हे क्रिप्टो वॉलेट नाही. क्रिप्टो वॉलेटमध्ये क्रिप्टोकरन्सी स्टोर होत नाहीत. त्यात फक्त प्रायव्हेट की (Private Keys) स्टोर केल्या जातात. त्यामुळे जेव्हा कोणतेही नवीन क्रिप्टो वॉलेट तयार केले जाते. तेव्हा हे सीड फ्रेज जनरेट केले जाते. या फ्रेजमध्ये काही वर्डस् असतात. जे.बी.आय.पी. 39 स्टॅण्डर्ड (BIP39 Standard) च्या 2,048 इंग्रजी शब्दांच्या यादीतून घेतले गेलेले असतात. या शब्दांचा वापर सीड फ्रेज जनरेट करण्यासाठी केला जातो. एका सीड फ्रेज मध्ये 12 किंवा 24 शब्दांचा समावेश असतो आणि प्रत्येक सीड फ्रेज हा इतर वॉलेट्सच्या सीड फ्रेज पेक्षा वेगळा असतो.
ज्या शब्दांपासून सीड फ्रेज तयार होते. ते शब्द एका रॅण्डम डिजिटच्या स्ट्रिंग्सशी म्हणजेच एका क्रमाने मेळ घालणारे असतात. या डिजिट स्ट्रिंगला सीड असे म्हटले जाते. जेव्हा अकाउंट रिकव्हर करण्याची गरज असते तेव्हा हे शब्द व्यवस्थित अरेन्ज केले जातात. अरेन्ज केल्यानंतर यूझर्सची प्रायव्हेट मास्टर की (Private Master Key) जनरेट होते. ज्याचा वापर करून वॉलेटमध्ये ठेवलेली मूळ प्रायव्हेट की मिळवली जाऊ शकते. हा सीड फ्रेजचा ऑप्शन कोणत्याही क्रिप्टो वॉलेटच्या सेटिंग्समध्ये असतो. रिकव्हरीसाठी या सीड फ्रेजमधील शब्दांना योग्य क्रमाने लावणे तितकेच महत्त्वाचे असते.
सीड फ्रेज दिसतात कसे?
सीड फ्रेजेस 12 किंवा 24 साधे व रॅण्डम शब्द असतात. असे म्हटले जाते की, मनुष्य रॅण्डम गोष्टींचा क्रम तयार करण्यात खूप कच्चा आहे; त्यामुळे इथे वॉलेट स्वत:च रॅण्डम शब्द जनरेट करतात.
12 शब्दांचा सीड फ्रेज असा दिसतो!
Avocado | Bench | Grail | Pillow |
Purpose | Granted | Beach | Western |
Trade | Again | Level | Sector |
24 शब्दांचा सीड फ्रेज असा दिसतो!
Avocado | Bench | Grail | Pillow |
Purpose | Granted | Beach | Western |
Trade | Again | Level | Sector |
Polar | Cry | Wolf | Nephew |
Tourist | Flush | Board | Citizen |
Project | Impulse | Latin | Strong |
सीड फ्रेजबाबात महत्त्वाची सूचना : सीड फ्रेझ म्हणजे असे कोणतेही शब्द नाहीत; जे तुम्ही लक्षात ठेवू शकाल. कारण त्यांचा क्रमही तितकाच महत्त्वाचा आहे. क्रम सीड फ्रेजचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रिकव्हरी दरम्यान क्रमांनुसार शब्द टाकवे लागतात.
सीड फ्रेज कसा ठेवायला हवा?
सीड फ्रेजचे शब्द व त्यांचा अचूक क्रम लक्षात ठेवणं थोड किचकट नक्कीच आहे. त्यामुळे ते योग्य ठिकाणी सुरक्षितरीत्या ठेवणे महत्वाचे आहे. तुमचा हा सीड फ्रेज कधीच डिजिटली स्टोअर करू नका. कारण त्यामुळे हॅकर्सकडून धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. अशावेळी शाळेतील जुन्या पद्धतींचीच मदत होते. म्हणजे एका कागदावर तुम्ही तो लिहून ठेवू शकता. पण कागदावर लिहून तोच कागद खिशात ठेवून तुमच्या खिशांवर अतिविश्वास दाखवणे महागातही पडू शकते.
सीड फ्रेज जर तुमच्याकडून कोणत्याही परिस्थितीत हरवले तर तुमच्या अकाउंटमधील पैशांचा अॅक्सेस तुम्ही गमावू शकता. सीड फ्रेज हे अकाउंट रिकव्हरीसाठी जरी वापरले जात असले, तरी त्याचे महत्त्व भरपूर आहे. त्यामुळे ते सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. जर चुकून सीड फ्रेज विसरला गेला किंवा तो चोरीला गेला तर ते अकाउंट रिकव्हर करता येत नाही. मुळात याच उद्देशाने सीड फ्रेज तयार केले गेले. क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूकदाराला खूप चांगल्याप्रकारे सुरक्षितता पुरवली जाते. पण यासाठी गुंतवणूकदाराने तेवढे सक्षम असणे गरजेचे आहे.