राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात बी-बियाणे, खते व इतर मशागत खर्चासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार बँकाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (Dr. PanjabRao Deshmukh Interest Subsidy Scheme) सुरू केली आहे. त्या योनजेचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. नेमकी योजना काय आहे आणि त्याचे निकष काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
शेतकऱ्यांना पीक हंमामासाठी अनेकवेळा कर्जाची गरज भासते. त्यादृष्टीने राज्य सरकारने डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना 3.00 लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीचे पीक कर्जावर 3 टक्के पर्यंत व्याजाची सवलत देण्यात येते. यापूर्वी शेतकऱ्यांना 3 डिसेंबर, 2012 च्या शासन निर्णयानुसार 1 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर 3 % सवलत आणि 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 1% व्याज सवलत देण्याची योजना होती. आता अल्पमुदतीच्या कर्जात 3 लाखांपर्यंतच्या कर्जाला 3% पर्यंत व्याजाची सवलत दिली जात आहे. ही योजना 2021-2022 पासुन सुरू करण्यात आली आहे.
काय आहेत योजनेच्या अटी-
- विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणारे शेतकरी यासाठी पात्र
- 3 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर शासनामार्फत 3 टक्के व्याजाची सवलत
- अल्प मुदतीचे कर्जे या लाभास पात्र ठरतात.
- तीन लाखापेक्षा जास्त कर्ज असेल, तर 3 लाखांपर्यंतच्या मर्यादेवरच व्याज सवलत राहिल.
- कर्जाची परतफेड विहित मुदतीत 365 दिवसात किंवा 30 जुनच्या पूर्वी करणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे-
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खासगी बँका यांच्याकडील कर्जदार शेतकऱ्यांची यादी, तसेच योजनेतील पात्र लाभ धारकांने घेतलेल्या कर्जाचा तपशील, परतफेडीचा दिनांक आणि रक्कमेचा तपशील या कागदपत्रांची आवश्यकता असते. या कागदपत्रासह लाभार्थ्याने थेट तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांचेकडे मागणी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे.