Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bamboo Farming : पडीक जमिनीत करा बांबू लागवड; मिळवा उसापेक्षा जास्त उत्पन्न

bamboo farming

Image Source : www.indiatimes.com

ऊस लागवडीमधून हेक्टरी उत्पादन किमान 100 टन आणि भाव प्रति टन किमान 2500 मिळतो. मात्र, बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन हे 100 टनापर्यंत मिळते आणि बांबूला मिळणारा भाव हा प्रति टन किमान 4000 रुपयांपर्यत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बांबू पिकाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

राज्यात सध्या बांबू शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे. उसाप्रमाणेच उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू शेतीकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही बांबू शेतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत असून विविध योजनांचीही अंमलबजावणीही करण्यात येत आहे. बांबूच्या लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. आज आपण बांबू लागवडीची फायदे, त्यापासून मिळणारे उत्पन्न आणि इतर फायदे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

उसाला पर्यायी पीक बांबू

बांबू हे शेतकऱ्यांसाठी बुहउद्देशीय आणि उपयोगी पीक आहे. शेतकऱ्यांना 10 गुंठ्यांपासून 1 हेक्टरपर्यंत बांबू लागवड करता येते. तसेच शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून शेती पूरक जोडधंदा मिळवा म्हणून शासनस्तरावरही प्रयत्न केले जात आहेत. उसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन बांबूच्या लागवडीतून मिळत आहे. ऊस लागवडीमधून हेक्टरी उत्पादन किमान 100 टन आणि भाव प्रति टन किमान 2500 मिळतो. मात्र, बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन हे 100 टनापर्यंत मिळते आणि बांबूला मिळणारा भाव हा प्रति टन किमान 4000 रुपयांपर्यत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बांबू पिकाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

कृषी अर्थव्यवस्थेला बळ

बांबूपासून अनेक प्रकारच्या वस्तूंसह इंधनाचीही निर्मिती केली जाते. बांबूपासून कागद, कापड, टुथब्रश, टोपी, चप्पल बुट शोभेच्या वस्तू ते इथेनॉल सारख्या इंधनाचीही निर्मिती केली जात आहे. यासाठी बांबूच्या विविध प्रकारच्या जातींची पीक लागवड केली जाते. सध्या भारतात देखील बांबूपासून 1800 प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. त्यामुळे बांबूचे पीक हे एक प्रकारे कृषी अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यास मदत होणार आहे.

उसापेक्षा जास्त इथेनॉल निर्मिती -

शासकीय माहितीनुसार 1 हेक्टर ऊस लावला तर 2 कोटी लिटर पाण्याची आवश्यकता लागते.तसेच 1 टन ऊस गाळला तर त्यातून 80 लीटर इॅथेनॉलची निर्मिती होते. त्याचप्रमाणे बांबू पासून इथेनॉल निर्मिती संदर्भात विचार केला तर 1 हेक्टर बांबू शेतीसाठी 20 लाख लीटर पाण्याची आवश्यकता भासते. तसेच 1 टन बांबू गाळला तर त्यापासून 400 लीटर इथेनॉलची निर्मिती होते. तसेच बांबूचे प्रति एकरी 40 टनापर्यंत उत्पादन मिळते, ज्याची अंदाजे किंमत  4000/ ते  25000/- प्रति टन आहे.

रोपांची उपलब्धता आणि बाजारपेठ

शेतकऱ्यांना टिश्यूकल्चर बाांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी  महाराष्ट्र बाांबू विकास मंडळाच्या  अटल बांबू समृध्दी योजनेच्या माध्यमातून रोपांचा पुरवठा केला जातो. यासाठी सामाजिक वनिकरण विभागाकडूनही मदत केली जाते. तसेच ही रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जातात. याबरोबर बांबूचे उत्पादन सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.


बांबू शेतीचे फायदे -

  • बांधाच्या कडेला, पडीक जमिनीत, ओढ्या नाल्याच्या बाजूस लागवड करता येते.
  • तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. 
  • जमिनीची धूप व जलसंवर्धन होते. 
  • बांबूचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षाचे आहे. 
  • पहिली दोन वर्ष त्यामध्ये आंतरपीक घेता येते. 
  • क्षारपड व नापिक जमिनीवरही बांबू लागवड करता येते.
  • कमी अथवा जास्त पाऊस झाला तरी बांबू शेतीचे नुकसान होत नाही.


पर्यावरणाच्या रक्षणसाठीही बांबूची लागवड फायदेशीर

पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याने ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण होते आहे. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी बांबू शेती फायदेशीर ठरत आहे.त्याच बरोबर एका व्यक्तीस वर्षाला किमान 280 किलो ऑक्सिजनची गरज भासते. बांबूपासून वर्षाला 320 किलो ऑक्सिजन हवेत उत्सर्जित केला जातो. त्याप्रमाणे एक एकर बांबू शेतीतून सर्वसाधारण 60 टन ऑक्सिजन उत्सर्जित केला जातो. तसेच एक हेक्टर क्षेत्रामधून सुमारे 200 टन र्काबन डायऑक्साईड हवेतून बांबूव्दारे शोषला जातो. त्यामुळे बांबूची शेती पर्यावरणाच्या दृष्टीनेही फायद्याची आहे.