Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

किसान विकास पत्र (KVP) योजनेचे नवीन व्याजदर जाहीर

किसान विकास पत्र (KVP) योजनेचे नवीन व्याजदर जाहीर

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना असून 30 जून, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेचे वार्षिक चक्रवाढ व्याज दर 6.9 टक्के ठेवण्यात आले आहेत.

किसान विकास पत्र ही पोस्टाची निश्चित-दर बचत प्रमाणपत्र योजना आहे; जी सर्वप्रथम 1988 मध्ये भारतीय पोस्टाने (Indian Post) सुरु केली होती. किसान विकास पत्र (KVP) योजनेत किमान 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह कोणीही गुंतवणूक करू शकतं. जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल, तर यासाठी पॅन कार्ड द्यावे लागते. या योजनेत ठेवीदाराला चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो. 1 एप्रिल, 2020 पासून या योजनेचे वार्षिक चक्रव्याढ व्याज दर 6.9 टक्के आहे. या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम 124 महिन्यांत 10 वर्षे 4 महिन्यात दुप्पट होईल.

काय आहे किसान विकास पत्र योजना?

हे एक असे प्रमाणपत्र आहे जे कोणतीही भारतीय व्यक्ती खरेदी करू शकते. बॉण्डप्रमाणेच या योजनेचं प्रमाणपत्र दिलं जातं. देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये याचं खातं उघडता येऊ शकतं.

KVP खाते कोण उघडू शकतो?

या योजनेत भारतातील कोणताही प्रौढ नागरिक तसेच 10 वर्षांपेक्षा अधिक आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेली अल्पवयीन, प्रौढ व्यक्तीसोबत खाते उघडू शकते. यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

किसान विकास पत्र मध्येच बंद करता येऊ शकते?

खालील नियमांची पूर्तता झाल्यास किसान विकास पत्र योजना मुदतीपूर्वी बंद करता येऊ शकते.
1. जेव्हा एकच खाते, किंवा संयुक्त खात्यातील (Joint Account) कोणाचेही किंवा सर्व खातेधारकांचे निधन झाल्यावर. 
2. गॅझेट ऑफिसर असल्याच्या तारणधारकाने जप्त केल्यावर.
3. न्यायालयाने आदेश दिल्यावर.
4. जमा केल्याच्या तारखेपासून 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर.
5. खात्याचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण

किसान विकास पत्र हस्तांतरित करता येतात का?

1. खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसांना.
2. खातेदार ते संयुक्त धारकाच्या मृत्यूवर.
3. न्यायालयाच्या आदेशानुसार.
4. निर्दिष्ट प्राधिकरणाकडे खाते तारण ठेवल्यावर.

कर लाभ (Tax benefit)

किसान विकास पत्र योजना आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र नाही. यातून मिळणारा परतावा हा पूर्णपणे करपात्र आहे. पण असे असले तरी, मुदत पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या पैशांवर टीडीएस (स्रोतावर कर वजा) सूट मिळते.

किसान विकास पत्र (KVP) योजनेचा लाभ तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या विभागीय कार्यालयातून घेऊ शकता. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांसाठीही विकास पत्र खरेदी करता येते. तसेच दोन व्यक्तींच्या नावानेही (Joint Account) विकास पत्र खरेदी केलं जाऊ शकतं.

Image Source- https://bit.ly/38kOKeh