किया वाहन निर्मिती कंपनीने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कार भारतीय बाजारात विकल्या. कंपनीच्या वाहन विक्रीत 2021 वर्षाच्या तुलनेत 94.7% वाढ झाली आहे. 2021 साली डिसेंबर महिन्यात कियाने भारतात 7 हजार 797 कार विकल्या होत्या. मात्र, 2022 च्या डिसेंबर महिन्यात कंपनीने 15 हजार 184 गाड्यांची विक्री केली.
2022 वर्षात कंपनीने वाहनविक्रीत 47.7 टक्के वाढ नोंदवत तब्बल 3 लाख 36 हजार 619 गाड्यांची विक्री केली. २०२१ साली कंपनीने २ लाख २७ हजार ८४४ गाड्यांची विक्री केली होती. याकाळात स्थानिक बाजारातही कंपनीच्या गाड्यांची विक्री वाढली. भारतामध्ये 2021 च्या तुलनेत कंपनीचा सेल सुमारे ४० टक्क्यांनी वाढला. २०२१ साली कंपनीने १ लाख ८१ हजार ५८३ गाड्यांची विक्री केली होती. त्यात २०२२ साली वाढ झाली. मागील वर्षात कंपनीने सुमारे अडीच लाख गाड्या भारतात विकल्या. तर ८२ हजार ६३ गाड्या निर्यात केल्या.
जागतिक अस्थिरता आणि कोरोनामुळे कच्चा माल पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतानाही कियाने भारतीय बाजारात चांगली कामगिरी केली, असे कंपनीचे भारतातील मार्केटिंग विभागाचे प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी म्हटले. ऑगस्ट २०१९ साली मोठ्या प्रमाणात गाड्यांचे उत्पादन भारतात सुरु केल्यापासून ४१ महिन्यांमध्ये आम्ही ८ लाख कार विक्रीचा टप्पा पूर्ण केला, असेही ब्रार म्हणाले.
किया सेल्टोस, कार्निव्हल, सोनेट या गाड्या भारतीय बाजारामध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. जानेवारी पासून सर्वच कार निर्मिती कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र, तरीही गाड्यांची विक्री वाढत आहे. मागील काही दिवसांत व्याजदर वाढत असतानाही वाहन कर्ज मोठ्या प्रमाणावर बँकाकडून देण्यात येत आहे.