Income Tax Returns : नव्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही तुमचासाठी योग्य कर प्रणाली ठरवली असेल (नवीन आर्थिक वर्षापासून तुम्हाला नवीन कर प्रणालीचा पर्यायही उपलब्ध आहे) तर आता पुढचं काम आहे ते म्हणजे आयटीआर फायलिंग (ITR Filing) करणं. एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षातल्या आपल्या मिळकतीवर आपल्याला आयकर कायद्या अनुसार कर भरावा लागतो. आणि त्यासाठी आपल्या मिळकतीचा हिशोब सरकारला देण्यासाठी भरलेला फॉर्म म्हणजे आर्थिक विवरणपत्र. यालाच इन्कम टॅक्स रिटर्न्स असं म्हणतात.
हे विवरणपत्र नियमितपणे भरण्याचे काही महत्त्वाचे फायदे इथं आपण बघणार आहोत.
आपल्याला आपला कर हा नवीन करप्रणालीनुसार भरायचा आहे की जून्या करप्रणालीनुसार हा निर्णय आपल्याला यावेळेस घ्यायचा आहे. तेव्हा ही करप्रणाली समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपले उत्पन्न किती आहे, आपल्या कर भरावा लागणार आहे का? आपली गुंतवणूक किती आहे, ती कर परताव्यासाठी पात्र आहे का या सर्व बाबी तपासून योग्य वेळी अचूक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा दिरंगाई टाळून योग्यवेळी आयकर विवरण पत्राची प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे.
हे आयकर विवरण पत्र सादर करण्यासाठी आयकर विभागाकडून 31 जुलै पर्यंतची मुदत दिलेली असते. या दिलेल्या वेळेपर्यंत जर आपण कर पत्र सादर केलं नाही तर आपल्याकडून दंड आकारला जातो. त्याशिवाय इतरही अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा हे सगळं व्याप टाळायचे असतील तर योग्यवेळी तुमचं आयकर विवरण पत्र आयकर विभागाकडे सादर करा.
Table of contents [Show]
दंड आकारणी
आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या वेळेत जर तुम्ही तुमचं आयकर विवरण पत्र सादर केलं नाही तर तुम्हाला 5 हजार रूपयाचा दंड भरावा लागतो. यामध्ये ज्या कुणाचं उत्पन्न हे कर भरण्यासाठी पात्र नसलं तरी अशा व्यक्तिला सुद्धा उशीरा विवरण पत्र सादर करीत असल्यामुळे दंड द्यावा लागतो. यामध्ये तुम्ही जितका उशीर कराल त्यानुसार दंडाची रक्कम ही वाढत जाते.
व्याज आकारणी
जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर कर भरावा लागत असेल आणि जर तुम्ही विवरण पत्र सादर करण्यास उशीर केलं असेल तर तुम्हाला दंडाच्या रकमेसह तुम्हाला भराव्या लागणाऱ्या करासकट त्यावरचं व्याज सुद्धा आयकर विभागाला द्यावं लागतं.
विवरण पत्र तपासणी
विवरण पत्र सादर केल्यावर त्यामध्ये काही दुरूस्ती करायची असेल तर त्यासाठी सुद्धा विशेष कालावधी आयकर विभागाकडून दिला जातो. जर आपण चुकीची माहिती दिली असल्यास आपला फॉर्म नाकारला जातो. किंवा मिळकती बाबत चुकीची माहिती असल्यास आकारला जाणार कर हा जास्त असू शकतो. अशावेळी लवकर फॉर्म सबमिट केल्यावर तो पुन्हा तपासून त्यात गरज असल्यास त्याप्रमाणे बदल करुन तो पुन्हा सबमिट करता येतो. ही प्रक्रिया लवकर सुरू केल्याने होणाऱ्या चूका आपल्याला टाळता येतात.
कर परतावा
योग्य वेळी विवरण पत्र सादर केल्यावर आपल्याला जर कर परतावा मिळणार असेल तर तो आपल्याला नवीन चालु आर्थिक वर्षात आपल्या खात्यावर जमा केला जातो. मात्र, आपण विवरण पत्र सादर करण्यास उशीर केला तर पुढील सर्व प्रक्रियेमध्ये दिरंगाई होऊन मिळणारा कर परतावा सुद्धा विलंबाने मिळतो.
आर्थिक पत
आयकर विवरण पत्र हे फक्त ज्यांना आपल्या वार्षिक उत्पन्नावर कर लागतो त्यांनीच भरावा असं नाही. तर ज्यांना कर लागत नाही अशा व्यक्तीनीसुद्धा विवरण पत्र सादर करायचं असतं. नियमित विवरण पत्र सादर केल्याने आपली क्रेडिट स्कोर हा चांगला होतो. यामुळे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे सोपे होते.