Financial Planning for Childrens: सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे भरमसाठ पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यातील कोणता पर्याय माझ्या मुलांच्या भविष्यासाठी चांगला आहे; ज्यातून चांगला नफा मिळू शकेल. हे ठरवता येत नसल्यामुळे कन्फ्युजनच अधिक होते. अशावेळी पुरेशी माहिती आणि योग्य रिसर्च केला तर तुमची कन्फ्युजन चुटकीसरशी दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याकरिता गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मिळेल.
Table of contents [Show]
आर्थिक ध्येय निश्चित करा
गुंतवणुकीच्या विविध पर्यायातून आपल्यासाठी योग्य पर्याय निवडताना आपले आर्थिक ध्येय/उद्दिष्ट निश्चित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते ध्येय पूर्ण होण्यासाठी कालावधी किती आहे. त्यासाठी गुंतवणूक किती करावी लागेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही किती जोखीम स्वीकारू शकता. अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेणे योग्य ठरू शकते.
फक्त चिल्ड्रन प्लॅन म्हणून गुंतवणूक नको!
बऱ्याचदा कंपन्यांकडून प्लॅनच्या नावाने जाहिरात केली जाते. या जाहिरातीला अनेक जण भुलतात. त्या प्लॅनमध्ये काय दिले आहे; यावर फोकस करण्यापेक्षा Children's Plan मुलांसाठी आहे, यावर लक्ष केंद्रीत केले जाते. प्लॅनच्या नावापेक्षा त्यातून मिळणारे फायदे महत्त्वाचे. तसेच त्यासाठी किमान गुंतवणुकीची अट काय? जोखीम किती? परतावा किती मिळणार? गुंतवलेले पैसे लगेच काढता येणार का? मूळ रक्कम आणि रिटर्न यावर कर सवलत मिळणार का? या गोष्टी तपासूनच मुलांसाठीची गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
चिल्ड्रन प्लॅन की म्युच्युअल फंड?
मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एक मोठा निधी तयार व्हावा, अशी साधारण पालकांची अपेक्षा असते. यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या स्कीमपैकी एक पर्याय निवडताना आपण मुलांसाठीच्या प्लॅनची शोधाशोध करतो. जसे की, बऱ्याच इन्शुरन्स कंपन्यांनी Child Insurance प्रोडक्ट मार्केटमध्ये आणली आहेत. त्यात Child endowment plan किंवा child unit linked insurance plan (Ulip) यांचा समावेश होतो.
Child endowment plan ही एक पारंपरिक पॉलिसी आहे. जी मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना परताव्यासह एक ठराविक रक्कम देते आणि त्याचबरोबर लाईफ कव्हर पुरवते. तर युलिपसारख्या योजना या मार्केटशी संलग्न असतात. त्यातून पारंपरिक स्कीमपेक्षा थोडेफार जास्त रिटर्न मिळतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, चाईल्ड इन्शुरन्स प्लॅनमधून दोन गोष्टी मिळतात. एक इन्शुरन्स आणि दुसरी गुंतवणूक. पण या दोन गोष्टी मिळत असताना त्याचा परतावा कशाप्रकारे मिळतो. हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. त्याचबरोबर काही चिल्ड्रेन प्लॅनमधून पालकांना सेक्शन 80C अंतर्गत कर सवलतदेखील मिळते. अशावेळी आपल्या गुंतवणुकीची गरज काय आहे यावर फोकस ठेवणे आवश्यक आहे.
आर्थिक उद्दिष्ट कोणती योजना पूर्ण करू शकते?
चिल्ड्रेन प्लॅनच्या तुलनेत म्युच्युअल फंडचा विचार करता तुमची जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि भविष्यात अपेक्षित असलेला परतावा लक्षात घेतला तर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते का? याचा विचार केला पाहिजे. तु्म्हाला भविष्यात चांगला निधी उभारायचा आहे. तर फक्त त्यावर लक्ष केंद्रीत करून चांगला निधी मिळवून देणाऱ्या योजनांचा विचार केला पाहिजे. जसे की, उच्च शिक्षणाची सध्याची किंमत 15 ते 20 लाख रुपये आहे. ती 10 वर्षांनी वाढून 25 ते 30 लाख रुपये होऊ शकते. एवढी रक्कम उभारण्यासाठी जास्तीत जास्त परतावा कोण देऊ शकतं. अशा योजना पाहिल्या पाहिजेत. ज्या तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतात.
मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण ती लवकरात लवकर करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांसाठी गुंतवणूक करताना एकाच स्कीममध्ये सर्व गोष्टी मिळतील असा अठ्ठाहास ठेवू नका. त्याऐवजी चांगला परतावा, मुलांसाठी इन्शुरन्स, टॅक्समध्ये सवलत, मुलांसाठीच्या सरकारी योजना असा परिपूर्ण विचार करूनच मुलांसाठी गुंतवणूक करा.