"In case you can’t be there to catch them, make sure you leave a safety net." अर्थातच आपल्यापैकी कुणीच कुणाला आयुष्यभरासाठी पुरणार नाही. फक्त आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या प्रियजनांना आणि त्यामध्येही विशेषतः आपल्या मुलांना, त्यांच्या भविष्याला, त्यांच्या सुख-दुःखाला एक "सेफ्टी नेट" देणे, आपली जबाबदारीच नाही, तर आपले कर्तव्य देखील आहे. CoviD-19 असो किंवा युक्रेन-रशिया युद्ध असो, जगाच्या पाठीवर होणाऱ्या घटनांचा थेट परिणाम आपल्या घरावर, आपल्या मुलांवर, त्यांच्या भविष्यावर, त्यांच्या स्वप्नांवर होऊ लागलाय. मग अशा वेळी "चाईल्ड इन्शुरन्स प्लॅन" हा एक "सेफ्टी नेट"चे काम करतो.
म्युच्युअल फंडस्, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट, PPF, रिअल इस्टेट किंवा अगदी सोन्यामधली गुंतवणूक असो, ही सर्व आपल्या स्वतःच्या निधीमधून संचित होणारी संपत्ती असते आणि म्हणून अशा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमधील सर्वात महत्वाची समस्या अशी असते की, गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास संपत्तीचा होत असलेला नियमित संचय थांबतो. पण जगरहाटी कोणाहीसाठी थांबत नसते. मुलांची अर्धी राहिलेली शिक्षणं, त्यांचं असुरक्षित भविष्य, एकूणच अनिश्चितता "आ" वासून उभी असते. आणि तेव्हा पालकांच्या मृत्यूनंतरदेखील मुलांच्या आर्थिक गरजांची काळजी घेणारी "चाईल्ड इन्शुरन्स पॉलिसी" मुलांच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजा भागविण्यासाठी गुंतवणुकीचा निधी, एक चांगला कॉर्पस तयार ठेवते.
चाईल्ड इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या नावावर खरेदी केली जाते, त्या मुलांना "इन्शुअर्ड" म्हटले जाते आणि त्यांच्यासाठी पॉलिसी खरेदी करून प्रीमिअम भरणाऱ्या पालकांना "पॉलिसीधारक" आणि "प्रपोजर" म्हटले जाते. चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे पॉलिसीधारक पालक दुर्दैवाने मरण पावल्यास, "चाइल्ड प्लॅन" हे सुनिश्चित करतो की, निश्चित रक्कम फक्त पूर्वनिर्धारीत वयातच प्रदान केली जाईल आणि त्याआधी किंवा त्यानंतर देखील नाही. ULIP किंवा एंडोमेंट सारख्या पॉलिसीजमध्ये तर मुलांना त्यांच्या विशिष्ट वयात "नियमित पेआउट" देखील मिळत राहतात. याशिवाय, ठराविक वेळेच्या अंतराने निश्चित रक्कम मिळू शकते. या नियमित पेआउट्सचा उपयोग शिक्षण, विवाह इत्यादींसंबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त आत्यंतिक इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये, (उदाहरणार्थ मुलांसाठीच्या कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत) पॉलिसीधारक पॉलिसीमधून उपचारांकरिता आंशिक पैसे काढू शकतो.
या विमा योजनेचा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारक पालकांच्या मृत्यूनंतर पॉलिसी चालू राहण्यासाठी निधी देते. आणि चाईल्ड प्लॅन्सचे हेच वैशिष्ट्य तिला अद्वितीय बनवते. याचा अर्थ पॉलिसीधारकाचा मृत्यू देखील मुलांच्या आर्थिक आणि शैक्षणिक गरजांसाठीची होणारी बचत थांबवत नाही. मात्र असा चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना पॉलिसीधारकाने "WOP" "वेव्हर ऑफ प्रिमियम" (Waiver of Premium) या फिचरची निवड करणे आवश्यक आहे. WOP चे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीधारकाचा पॉलिसी-टर्मच्या दरम्यान दुर्दैव मृत्यू झाल्यास इन्सुअर्ड व्यक्तीला म्हणजे मुलांना विम्याच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम (Double the Sum Assured) मिळते. अर्थात "WOP" सह चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन सामान्य प्लॅनपेक्षा महाग असतात. कारण ते पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरही केलेल्या गुंतवणुकीसाठी निधी देत असतात.
मार्केट-लिंक्ड चाईल्ड इन्सुरन्स प्लॅन्स देतात 10% ते 12% वार्षिक परतावा
भारतामधील सद्यस्थितीमधील चलनवाढ (inflation) 6%च्या आसपास आहे. आपल्या पैशांची भविष्यामधली किंमत आजच्या किंमतीपेक्षा निश्चितच कमी झाली असेल आणि आपण पैसे वाचवून आपले पैसे देखील वाढणार नाहीत. मग अशा वेळी "मार्केट-लिंक्ड चाईल्ड इन्सुरन्स प्लॅन्स" आपल्याला प्रतिवर्ष 10% ते 12% वार्षिक परतावा (annual returns) देतात. मार्केट-लिंक्ड चाइल्ड इन्शुरन्स प्लॅनकडून पॉलिसीधारक सध्याच्या महागाई दरापेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा करू शकतो. त्यामुळेच "चाईल्ड पॉलिसीज्" केवळ बचत किंवा गुंतवणूक नाही, तर आपल्या भावी पिढीच्या सुरक्षित भविष्याची पायाभरणी असतात.