Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफ इन्शुरन्स ही मालमत्ता आहे का? जाणून घ्या इत्यंभूत माहिती!

Life Insurance is Asset

वास्तविक प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, संपत्ती. प्रॉपर्टी म्हणजे अशी वस्तू जिला व्हॅल्यू (value) आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिच्यावर कोणाची तरी मालकी आहे आणि जिला कायदेशीर मालक (legal right of ownership) आहे. तर याच नियमानुसार ‘लाईफ इन्शुरन्स पॉलिसी’ ही एक प्रकारची चल संपत्ती (movable Property) मानली जाते.

“आज मेरे पास गाडी हैं, बंगला हैं, बँक बॅलन्स हैं, बिल्डींगें हैं, प्रॉपर्टी हैं, तुम्हारे पास क्या हैं?”, सत्तरच्या दशकामध्ये 70 mmच्या पडदयावर विचारला गेलेला आणि अवघ्या भारतवर्षाला वेड लावणारा “अँग्री यंग मॅन” बच्चनचा सुप्रसिद्ध डायलॉग. प्रॉपर्टी. प्रॉपर्टी हा शब्दच खूप काही जमीन-जुमला, मोठाली कोठीवजा हवेली, खानदानी इस्टेट किंवा ‘चाय के बागान’बद्दल बोलत असल्याचा फील देतो.

वास्तविक प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती. प्रॉपर्टी म्हणजे अशी वस्तू जिला व्हॅल्यू (value) किंवा मूल्य आहे, जिच्यावर कोणाची तरी मालकी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जिला कायदेशीर मालक (legal right of ownership) आहे. मग यामध्ये जमीन, बिल्डिंग्ज, वाहने यांसारख्या मूर्त वस्तू (corporeal / tangible) येतात आणि पेटंट हक्क, कॉपीराइट्स, गुडविल यांसारख्या कायदेशीर हक्क आणि मालकी असणाऱ्या अमूर्त गोष्टी (incorporeal / intangible) देखील येतात.

भारतीय कायद्याचा विचार केला तर, सर्वसाधारण वाक्खंड कायदा, १८९७ (General Clauses Act, 1897) च्या सेक्शन 3 नुसार, संपत्ती किंवा मालमत्ता (Property) ही चल संपत्ती आणि अचल संपत्ती प्रकारात मोडली जाते. यांपैकी अचल मालमत्ता म्हणजे Immovable Property म्हणजे भूमीशी कायमस्वरूपी जोडलेली वस्तू. याव्यतिरिक्त कोणतीही मालमत्ता ही चल मालमत्ता म्हणजे movable Property मानली जाते. “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी” ही अशीच चल संपत्ती प्रकारची वस्तू आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी एक लिखित स्वरूपात असणारे डॉक्युमेंट (दस्तऐवज) आहे. पॉलिसी गहाण (mortgage) ठेवता येते, तिच्यावर कर्ज (loan) घेता येऊ शकते, एका व्यक्तीच्या नावे घेतलेली पॉलिसी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असाइन (assign) करता येते, तिच्या कायदेशीर हक्कप्राप्तीसाठी कारवाईयोग्य दावा (actionable claim) करता येतो. 

राहती जागा, दागदागिने, पैसा-अडका, गाडी या मालमत्तांचे जसे मालकी हक्क बदलता येऊ शकतात, त्याचप्रमाणे इन्शुरन्स कायदा, 1938 च्या सेक्शन 38 अन्वये पॉलिसीची मालक असणारी व्यक्ती (Policy Owner) आपल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या मालकी हक्काचे किंवा मृत्यूनंतरच्या लाभांचे (Death Benefits) हस्तांतरण होऊ शकते. असाइनमेंट प्रक्रियेने पॉलिसी-ओनर पूर्णतः किंवा अंशतः आपल्या पॉलिसीच्या हक्कांचे कायमस्वरूपी किंवा तात्पुरते हस्तांतरण करू शकतो. ज्याच्या नावावर पॉलिसी असाईन (हस्तांतरित) झाली आहे, अशी व्यक्ती (Assignee) यानंतर पॉलिसीधारक बनते. मात्र पॉलिसीचा मालक जरी कायमस्वरूपी किंवा तात्पुरता बदलत असला, तरीदेखील ज्याचे नावे पॉलिसी घेतली गेली आहे तो “लाईफ अशुअर्ड” (Life Assured) बदलत नाही. 

मालमत्तेच्या इतर प्रकारांप्रमाणेच लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर देखील कर्ज प्राप्त होऊ शकते. एन्डॉवमेंट, मनीबॅक पॉलिसी, अगदी युनिट लिंक्ड प्लॅन्स वर देखील कर्ज मिळू शकते. खाजगी बँक, सहकारी पतपेढ्यांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी व्याज-दराने इन्शुरन्स कंपनीज् इन्शुरन्स पॉलिसींवर कर्ज देतात. पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू (समर्पण मूल्य) विचारात घेऊन सरेंडर व्हॅल्यूच्या अगदी 85 ते 90 % कर्ज दिले जाऊ शकते. यामध्ये आपल्याला आपली पॉलिसी इन्शुरन्स कंपनीच्या नावे तारण ठेवावी लागते. विहित कालावधीमध्ये आपण घेतलेल्या कर्जासोबत प्रिमिअमचे हप्ते देखील भरायचे असतात. कर्जाची परतफेड झाल्यावर इन्शुरन्स कंपनी आपली पॉलिसी पुन्हा आपल्या नावावर ट्रान्सफर करते. केवळ टर्म प्लॅन (म्हणजे मुदत विमा) वर विमा कंपनी कर्ज देत नाही.