सोन्याचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मध्यमवर्गीय माणूस सोन्याचा भाव कधी कमी होतोय याची वाट पाहत असतो. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दिवाळी या सणांच्या दिवशी सोनं घेणं शुभ मानलं जातं. अशावेळी सोनं महाग असेल तर दागिने घेण्यापेक्षा सोन्याची नाणी किंवा वळी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येतो. तसेच खरेदी केलेलं सोनं हे अडचणीच्या काळात तात्काळ पैशाची मदत मिळवून देऊ शकतं.
सोन्याची नाणी का खरेदी करावी?
सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत नाणी स्वस्त पडतात. दागिने आणि नाण्याच्या किमतीतील हा फरक घडणावळीमुळे असतो. सध्या बाजारात 0.5 पासून 50 ग्रॅमपर्यंतची नाणी उपलब्ध असतात. सोन्याच्या नाण्यांची घडणावळ 4 ते 11 टक्क्यांपर्यंत घेतली जाते, तर दागिन्यांसाठी 8 ते 10 टक्के इतकी घडणावळ घेतली जाते. म्हणूनच नाणी खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे. तुम्ही सोन्याचं नाणं बँकेतून खरेदी करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार, बँकेने एकदा विकलेलं नाणं बँक पुन्हा घेत नाही. त्यामुळे बँकेतून नाणी खरेदी करण्याआधी पूर्ण विचार करूनच जा.
सोन्याची शुद्धता
सोनं विकत घेताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो, तो सोन्याच्या शुद्धतेचा. 24 कॅरेट सोनं असेल तर त्याला शुद्ध सोनं मानलं जातं. तर दागिने 22 कॅरेट सोन्यापासून बनवतात. काय असतो फरक 22 व 24 कॅरेट सोन्यामध्ये ते आपण समजून घेऊ. शुद्ध सोन्याचा महत्त्वाचा मापदंड म्हणजे हॉलमार्क. शुद्ध सोन्याचं नाणं म्हणजे 999 हॉलमार्क, म्हणजेच 24 कॅरेट सोनं. तसेच हे सोनं मोडून दागिने बनवायचे झाल्यास चालू भावाप्रमाणे याची किंमत मिळते. कारण दागिने हे 22 कॅरेटमध्ये बनतात. त्यामुळे नाण्याची किंमत अधिक येते. तसेच जर नाणं किंवा सोन्याचा दागिना घ्यायचा असेल तर त्यामुळे नाण्यावर हॉलमार्क असेल तरंच ते विकत घ्या. सोन्याच्या नाण्यांचे विशिष्ट पद्धतीनं पॅकेजिंग केलेलं असतं. या पॅकेजिंगमुळे सोन्याच्या शुद्धतेचा अंदाज आपल्याला येतो. शिवाय कोणत्याही प्रकारे टॅम्परिंगही कुणी करू शकत नाही.
फायदेशीर गुंतवणूक
गुंतवणुकीचा अर्थ असा होतो की, नफ्यासाठी पैशाची गुंतवणूक करणं. जेव्हा आपण दागिन्यांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा ते विकताना आपल्या मेकिंग चार्जेसचं नुकसान सोसावं लागतं. त्यामुळे साधारणत: सोन्या-चांदीच्या वस्तू विकू नयेत. पण दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी खरेदी करून गुंतवणूक केली तर भविष्यात सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर आपण ही नाणी विकून आपल्याला कोणत्याही नुकसानाशिवाय त्या नाण्यांची जास्त किंमत मिळू शकते.
आपल्याला अनेक घटना पाहायला मिळतात की, साखळी चोरांकडून सोन्याचे दागिने खेचून चोरले जातात. अशावेळी दागिने घालून बाहेर जाणं हे काहीसं धोकादायक झालं आहे. पण जर आपण सोन्याची नाणी खरेदी करुन ते सेफ लॉकरमध्ये ठेवले तर चोरीला जाण्याचा संभव कमी असतो. तसेच आपली गुंतवणूकही सुरक्षित राहते.