उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही बाहेर फिरायला जाण्याचा विचार करताय का? जर विचार करत असाल आणि तुम्हाला धार्मिक स्थळांना भेट द्यायला आवडत असेल, तर 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' म्हणजेच IRCTC तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही अयोध्या, प्रयागराज आणि वैष्णोदेवी या प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देऊ शकणार आहात.
Table of contents [Show]
'या' धार्मिक स्थळांना देता येणार भेट
भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून तुम्हाला या उन्हाळ्यात धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. प्रवाशांना IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir), कटारा येथील वैष्णोदेवी (Vaishnodevi), प्रयागराजचे त्रिवेणी संगम (Prayagraj) आणि अलोपी (Alopi) येथील मंदिराचेही दर्शन घेता येणार आहे. बनारसच्या काशी विश्वनाथाचे (Kashi Vishwanath) दर्शनही प्रवाशांना या टूरमध्ये घेता येणार आहे.
प्रवासाची तारीख आणि बोर्डिंग स्थानके
या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रवाशांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल. मे महिन्यातील 27 तारखेला हा प्रवास सुरु होईल. जो 5 जून 2023 पर्यंत चालेल. एकूण 11 दिवसांचे हे टूर पॅकेज ग्राहकांना परवडेल अशाच किमतीत IRCTC ने तयार केले आहे. यामध्ये 10 रात्री आणि 11 दिवसांचा समावेश आहे.
आसाम येथील दिब्रुगड या ठिकाणावरून भारत गौरव ट्रेनचा प्रवास सुरु होईल. त्यानंतर ही ट्रेन मारियानी, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार आणि कटिहार या स्थानकांवर थांबेल. येथूनच प्रवाशांना बोर्डिंग आणि डिबोर्डिंग करता येईल.
प्रवास खर्च आणि बुकिंग
हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला http://www.irctc.co.in/nget या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या प्रवास श्रेणीतून प्रवास करता येणार आहे. यामध्ये इकोनॉमी आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी उपलब्ध आहे. इकोनॉमीसाठी एका प्रवाशाला 20,850 रुपये मोजावे लागतील, तर स्टॅण्डर्ड श्रेणीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 31,135 रुपये मोजावे लागतील.
'देखो अपना देश' मोहीम
IRCTC वेगवेगळी टूर पॅकेज प्रवाशांसाठी घेऊन येत असते. 'देखो अपना देश' या मोहिमे अंतर्गत अनेक टूर पॅकेज आयोजित केली जातात. यामध्ये ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा आणि परवडणारे दर उपलब्ध करून दिले जातात. IRCTC च्या पॅकेजबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा सोशल माध्यमांशी जोडले जाऊ शकता.
Source: www.financialexpress.com