भारतीय रेल्वेने (IRCTC) सोमवारी 29 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीतील उत्पन्नाची माहिती जाहीर केली. या माहितीनुसार कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 30 टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीला 214 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ज्यामध्ये यावर्षी 30.4 टक्के वाढ होऊन तो 279 कोटींपर्यंत पोहचला आहे. या निमित्ताने कंपनीला कोणत्या विभागातून किती नफा मिळाला, याबद्दल जाणून घेऊयात.
मार्च तिमाहीत या विभागातून मिळाला 'इतका' नफा
भारतीय रेल्वेला तिकीट बुकिंग आणि ट्युरिझम व्यवसायातून 965 कोटी रुपये मिळाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत हे उत्पन्न 691 कोटी रुपये इतके होते. यात 39.6 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये (EBITDA) मागील वर्षीच्या तुलनेत या मार्च तिमाहीत 16.5 टक्के वाढ होऊन 324 कोटी रुपयांवर पोहचले आहे. याच तिमाहीत मागील वर्षी ऑपरेटिंग प्रॉफिटमधून 278.5 कोटी रुपयांची कमाई झाली होती. याउलट मात्र या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये थोडी घट पाहायला मिळाली आहे. यावर्षी 33.6 टक्के प्रॉफिट मार्जिन झाले असून मागील वर्षी हे मार्जिन 40.3 टक्के इतके होते.
विशेष म्हणजे भारतीय रेल्वेला केटरिंग व्यवसायातून (Catering Busines) या वर्षीच्या मार्च तिमाहीत बक्कळ कमाई झाली आहे. या मार्च तिमाहीत कंपनीला केटरिंग व्यवसायातून 396 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे उत्पन्न 266 कोटी रुपये इतके होते. ज्यामध्ये या वर्षी 49 टक्के वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेमध्ये रेल नीरची विक्री देखील होते. यातून मार्च तिमाहीत भारतीय रेल्वेला 73 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे उत्पन्न 55 कोटी इतके असून यावर्षी त्यामध्ये 33टक्के वाढ झाली आहे. याशिवाय IRCTCच्या तिकीट विक्रीतून उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी हे उत्पन्न 293 कोटी रुपये इतके होते, जे या वर्षी 295 कोटी रुपये झाले आहे.
प्रति शेअर्स 2 रुपये लाभांश देणार
IRCTCच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2023 साठी प्रति शेअर 2 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर शेअर होल्डर्सकडून मंजुरी येणे बाकी आहे. सोमवारी IRCTCच्या शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. शेअर मार्केटमधील एनएसईवर (NSE) 3.55 टक्के वाढीसह 646.50 रुपये भाव मिळून सोमवारी मार्केट बंद झाले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. असे असले तरीही कंपनीच्या 1 वर्षाच्या शेअर्सच्या किंमतीत 7 टक्के घट झाली आहे.
Source: hindi.moneycontrol.com