अचानक रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो कन्फर्म तिकीटाचा! मेल/एक्सप्रेसचे रिझर्व्हेशन केले नसले तरी प्रवाशापुढे शेवटच्या क्षणी तिकिट बुकिंगचा पर्याय आहे. एखाद्या ट्रेनमध्ये शिल्लक जागा असेल तर प्रवाशाला शेवटच्या क्षणी तिकिट बुक करण्याची सुविधा IRCTC ने उपलब्ध केली आहे. ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधी कन्फर्म तिकिट बुक करण्याची संधी प्रवाशाला मिळते.
IRCTC च्या वेबसाईटवर शेवटच्या क्षणी तिकिट बुक करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. IRCTC च्या वेबसाईटवर चार्ट/व्हॅकेन्सी या सेक्शनमध्ये चार्ट तयार झालेल्या ट्रेन्समधील शिल्लक जागांचा तपशील दिला जातो. या सुविधेमध्ये ट्रेन्समधील सर्वच श्रेणीतील नऊ प्रकारच्या शिल्लक जागांचा ताजा तपशील दाखवला जातो. यात शिल्लक जागा असल्यास प्रवाशाला तिकिट बुकिंग करता येते. ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध केल्याने ती आता पारदर्शक झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
ट्रेन सुरु होणाऱ्या स्टेशनपासून शेवटचे स्टेशन या दरम्यान शिल्लक जागा किती आहेत याची माहिती प्रवाशाला मिळते. याशिवाय टिसीच्या माध्यमातून प्रवाशाला शिल्लक बर्थबाबत ताजी माहिती मिळू शकते. IRCTCचे हे खास फिचर वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर देखील उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : Railway Reservations Plans Open: गणपतीला कोकणात जाताय! रेल्वेच्या कन्फर्म तिकिटांसाठी 'या' तारखांवर लक्ष द्या
शेवटच्या क्षणी तिकिट बुकिंगची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशाला ट्रेनमधील कोचेस आणि त्यात शिल्लक जागांची ताजी माहिती मिळण्यास मदत होते. प्रत्येक कोचमधील आसनाचा इत्यंभूत तपशील दिला जातो. जसे की लोअर बर्थ, अप्पर बर्थ, साईड अप्पर, साईड लोअर याचा तपशील असतो.त्याचबरोबर बुक झालेल्या आसनावरील प्रवासी कुठपर्यंत प्रवास करणार याचाही तपशील असतो. जसे की प्रवासी शेवटी उतरणार असेल तर त्या बर्थचा स्टेटस राखाडी रंगाने दाखवला जातो. निम्मा प्रवास करणार असेल तर त्या आसनांना पिवळ्या रंगात दाखवले जाते. शिल्लक जागा या हिरव्या रंगात दर्शवल्या जातात.
ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी पहिला चार्ट रेल्वेकडून जाहीर केला जातो. दुसरा चार्ट हा ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटे आधी जाहीर केला जातो. या दोन्ही चार्टनंतर शिल्लक जागांचा तपशील चार्ट/व्हॅकेन्सी या सेक्शनमध्ये प्रवाशांना बघता येतो. यात प्रवासी मार्गावरील प्रत्येक चार्टिंग लोकेशननुसार माहिती संकलीत करुन शिल्लक जागांचा तपशील वेळोवेळी अपडेट केला जात असल्याने यातून अचूक माहिती प्रवाशाला मिळते.
ही सुविधा कशी वापरावी ते जाणून घ्या
- www.irctc.co.in या वेबसाईटवर जा.
- Chart/Vacancy हा पर्याय निवडा.
- ट्रेनचे नाव आणि नंबर
- तुम्हाला कोचनुसार बुकिंगचा तपशील दिसेल.
- शिल्लक जागा असल्यास उजव्या बाजूला रेल्वेच्या चिन्हाला क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही IRCTC च्या मुख्य वेबसाईटवर जाता.
- IRCTC चे लॉग इन पासवर्ड टाकून तुम्ही उपलब्ध शिल्लक तिकिट बुक करु शकता.