जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) येणाऱ्या दिवसांमध्ये अदानी समुहाच्या (Adani Enterprises Limited) आणखी पाच कंपन्यांचे आयपीओ (IPO) बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्याच्या मार्फत उद्योग समुहाने हरित हायड्रोजन (इंधन), विमानतळ देखभाल, रस्ते व हायवे (पायाभूत सुविधा), डेटा सेंटर उद्योग तसंच संरक्षण व एअरोस्पेस या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. आता याच कंपन्यांच्या विस्तारासाठी समुहाने लोकांमधून म्हणजे शेअरच्या माध्यमातून पैसे उभारायचं ठरवलं आहे.
या नवीन उद्योगांसाठी साधारण 20,000 कोटी रुपयांचं भांडवल शेअर बाजारातून उभं करण्याचं उद्दिष्टं अदानी उद्योग समुहाने ठेवलं आहे.
नवीन पाच कंपन्यांचे आयपीओ नेमके कधी बाजारात येतील याची रुपरेषाही कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी जुगेशिंदर सिंग यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एअरपोर्ट देखभाल कंपनीचा आयपीओ 2025मध्ये आणायचा आहे. तर हरित हायड्रोजन कंपनीचा आयपीओ 2026-27, पायाभूत सुविधा उभारणी कंपनी 24-25 आणि डेटा सेंटर कंपनीचा आयपीओ 2027-28 मध्ये शेअर बाजारात आणण्याच्या दृष्टीने कंपनीची तयारी सुरू आहे.
आतापर्यंत अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशन्स, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मर या सात कंपन्यांची नोंदणी शेअर बाजारात झालेली आहे. आणि मागच्या दहा वर्षांत या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना तगडा नफा कमावून दिला आहे.
प्रस्तावित आयपीओंमध्ये हरित हायड्रोजन निर्मितीसाठी समुहाने उभारलेली अदानी न्यू एनर्जी लिमिटेड ही कंपनी खुद्द गौतम अदानी यांची महत्त्वाकांक्षी कंपनी मानली जाते. सध्या अदानी एनर्जी लिमिटेड (ANIL) या कंपनीचा एक चतुर्थांश हिस्सा या कंपनीत आहे. पुढे जाऊन हा हिस्सा कमी करून तो शेअर बाजारातून उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या कंपनीचं उद्दिष्ट सध्या अस्तित्वात असलेल्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी अशा इंधनांचा वापर कमी करून तो हरित हायड्रोजनकडे वळवण्याचा आहे. अशा इंधनाच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रणा उभारण्यापासून ते तिची देखभाल आणि प्रत्यक्ष इंधन निर्मिती अशा सगळ्या गोष्टी ही कंपनी सांभाळणार आहे. म्हणजे सौरऊर्जा निर्मितीसाठी सौर पॅनल उभारण्यापासून त्यांची देखभाल आणि ऊर्जा निर्मिती हे काम अदानी न्यू एनर्जी लिमिटेड ही कंपनी करेल.
तर गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अदानी समुहाने ‘अदानी कनेक्स’ (Adani Connex) ही कंपनी स्थापन केली. या कंपनीचं उद्दिष्टं देशात 1 गिगावॅट क्षमता आणि वेग असलेली डेटास्पेस उभारणं हा आहे. चेन्नईत कंपनीचं एक डेटा सेंटर सुरूही झालं आहे. अशाच प्रकारचे हायपरस्केल (Hyperscale) वर्कस्पेस बनवण्याचं काम आणखी सहा शहरांमध्ये सुरू आहे. अशी औद्योगिक वसाहत किंवा जागा जिथे उच्च क्षमतेचं इंटरनेट नेटवर्किंग उपलब्ध असेल.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही कंपनीही दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. आणि कंपनीकडे सध्या नवी मुंबईच्या विमानतळाबरोबरच देशातील आणखी सहा विमानतळांच्या देखभालीचं काम आहे. काही ठिकाणी कंपनी नवीन एअरपोर्टही उभारत आहे. किंबहुना देशातील 25% प्रवासी आणि 40% कार्गो वाहतुकीचं नियोजन या कंपनीमार्फतच होतं.
इतर दोन कंपन्या ज्यांचा आयपीओ नजीकच्या काळात येऊ शकतो त्या आहेत अदानी संरक्षण व एअरोस्पेस आणि अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड. या कंपन्यांकडेही देशभरातल्या महत्त्वाच्या 27 शहरांमधली कंत्राटं आहेत.
कंपनीच्या मते अदानी समुहातले हे पाचही उद्योग नफा कमावणारे आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या आयपीओचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेस् या समुहाच्या फ्लॅगशिप कंपनीचा शेअर मागच्या एका वर्षांत साधारणपणे 117 टक्क्यांनी वधारला आहे. त्यामुळे अदानी समुहाच्या पुढच्या आयपीओकडेही शेअर बाजाराचं नक्कीच लक्ष असेल.