देशातील आघाडीच्या माध्यम समूहापैकी एक असलेल्या NDTV वर अखेर गौतम अदानी यांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाने NDTVच्या शेअर खरेदीसाठी दिलेली ओपन ऑफरची मुदत सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी संपली. यानंतर अदानी समूहाकडे NDTV ची 37% हिस्सेदारी आली आहे. अदानी समूह NDTV मध्ये सर्वात मोठा शेअर होल्डर बनला आहे.
NDTV मध्ये हिस्सा वाढवण्यासाठी अदानी समूहाने ओपन ऑफर दिली होती. कंपनीने शेअर मार्केटमधून प्रती शेअर 294 रुपयांचा दर जाहीर केला होता. ओपन ऑफरमधील 26% शेअर पैकी 8% शेअर अदानी समूहाने प्राप्त केले. यानंतर अदानी समूहाची एकूण हिस्सेदारी 37% इतकी वाढली आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या तुलनेत अदानी समूहाची हिस्सेदारी अधिक आहे. ज्यामुळे अदानी समूहाकडे संचालकांना संचालक मंडळावरुन काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
अदानी समूहाने विश्वप्रधान कर्मर्शिअल या कंपनीच्या माध्यमातून एनडीटीव्हीतील 29% शेअर खरेदी केले होते. त्यानंतर NDTV ला पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी अदानी समूहाने प्रयत्न सुरु केले होते. अदानी समूहाच्या ओपन ऑफरवर रॉय दाम्पत्याने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण सेबीकडे गेले. अखेर सेबीने ओपन ऑफरला परवानगी दिल्यानंतर अदानी समूहाकडून ती जाहीर करण्यात आली.
रॉय दाम्पत्य अजूनही NDTV च्या संचालक मंडळावर
NDTV ओपन ऑफरनंतर अदानी समूह मोठा शेअर होल्डर बनला आहे. मात्र एनडीटीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय हे दोघेही कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 1988 मध्ये प्रणय रॉय यांनी एनडीटीव्हीची स्थापना केली होती. ओपन ऑफरनंतर आता या दोन्ही संचालकांना संचालक मंडळावरुन हटवण्याचा अधिकार अदानी समूहाला प्राप्त झाला आहे. त्याशिवाय कंपनीचे आर्टिकल
ऑफ असोसिशनमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव अदानी समूहाला समभागधारकांसमोर मांडता येईल. तसेच विशेष ठराव मांडता येईल ज्यात 75% शेअर होल्डर्सची मान्यता लागेल.