Plada Infotech IPO: प्लाडा इन्फोटेक कंपनीचे शेअर आज एनएसई एसएमई (NSE SME)वर 22.9 टक्क्यांच्या प्रीमिअमसह 59 रुपयांवर लिस्टिंग झाला. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 23 टक्क्यांचा नफा झाला आहे.
प्लाडा इन्फोटेक कंपनीने आयपीओ आणताना त्याची प्रति शेअरची किंमत 48 रुपये निश्चित केली होती. पण आज या शेअर्सचे एनएसई एसएमईवर 59 रुपयांवर लिस्टिंग झाले. इंट्रा-डेमध्ये हा शेअर 60 रुपयांपर्यंत गेला होता. 29 सप्टेंबर पासून प्लाडा इन्फोटेक आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन झाला होता आणि तो 5 ऑक्टोबरपर्यंत खुला होता. याची प्रति शेअर किंमत 48 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर गुंतवणूकदारांना किमान 3000 शेअर्सचा लॉट घ्यावा लागत होता. यासाठी किमान 1.45 लाख रुपयांची गुंतवणूक गरजेची होती.
प्लाडा इन्फोटेकच्या आयपीओचे एकूण मूल्य 12.36 कोटी रुपये होते. कंपनीने पूर्णपणे नवीन 25.74 लाख शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. शैलेश कुमार दमाणी आणि अनिल महेंद्र कोटक हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा उपयोग कंपनी भांडवलासाठी तसेच टेक्निकल वस्तुंच्या पुरवठ्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे.
IPO म्हणजे काय?
निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.
SME IPO म्हणजे काय?
100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE असे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर SME IPOचे लिस्टिंग होते.
(डिसक्लेमर : आयपीओ किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स व आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)