SBI share price: स्टेट बँक ऑफ इंडियाने जून तिमाहीत चांगली कामगिरी केली. बँकेला मागील वर्षीच्या जून (2022) तिमाहीच्या तुलनेत यावर्षी 178.24% जास्त नफा झाला. त्यामुळे भविष्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर किती वर जाईल यावर आघाडीच्या ब्रोकर संस्थांनी अंदाज वर्तवला आहे. बँकेच्या मालमत्तांची स्थिती मजबूत असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेकडे ग्राहकांची संख्याही इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत असताना बँकिंग क्षेत्र तेजीत आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाला Net Interest Margins (NIM) चे लक्ष्य गाठता आले नाही. NIM म्हणजे बँकेला विविध व्यवसायातून मिळालेले एकूण व्याज आणि बँकेने ठेवीदारांना दिलेले व्याज याचे प्रमाण. बँकेची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजण्यासाठी NIM महत्त्वाचे प्रमाण आहे.
जेफरीजचा अंदाज काय?
भविष्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर वरती जाईल, असा अंदाज जेफरीज या ब्रोकर संस्थेने वर्तवला आहे. (SBI Share Price) 760 रुपये लक्ष्य किंमत जेफरीजने ठेवली आहे. आज SBI चा शेअर 570 रुपयांवर ट्रेड करत आहे. जेफरीजने जून तिमाही निकाल आणखी चांगला लागेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, नेट इंटरेस्ट मार्जिनमुळे बँकेला नफ्याचे लक्ष्य गाठता आले नाही, असे म्हटले आहे.
कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटी
कोटक इक्विटीनेही स्टेट बँकेचा शेअर वर जाईल असा अंदाज वर्तवला आहे. टार्गेट प्राइज 725 रुपये ठेवली आहे. बँकेचा नफा पुढील तिमाहीत आणखी वाढेल, असेही कोटकने म्हटले आहे. खासगी बँकांपेक्षा स्टेट बँकांच्या कर्जाची स्थिती पुढील काळात चांगली राहील, असे म्हटले आहे.
नुवामा ब्रोकर
नुवामा या ब्रोकर संस्थेनेही स्टेट बँकेचा शेअर वधारेल, असे म्हटले आहे. SBI चा शेअर 705 रुपयांवर जाईल, असे म्हटले आहे. बँकेच्या कर्ज आणि इतर मालमत्तांची स्थिती चांगली असल्याचे नुवामाने म्हटले आहे. मात्र, कोटक आणि जेफरीजच्या अंदाजापेक्षा शेअरची लक्ष्य किंमती कमी ठेवली आहे.