भारतातील जहाज बांधणी क्षेत्रातील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard) या नामांकित कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली आहे. शिपयार्ड कंपनीने आपला जून तिमाहीचा अहवाल जारी केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्स 17% वधारले होते. त्यानंतर आज गुरुवारी बाजाराच्या सुरुवातीलाही कोचीनच्या शेअर्सने उसळी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कंपनीच्या नफेवाढीचा शेअरवर परिणाम
कोचीन शिपयार्ड (COCHINSHIP ) ही भारतातील केरळ स्थित सर्वात मोठी जहाजबांधणी आणि देखभालीची सुविधा देणारी कंपनी आहे. या कंपनीने शेअर बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर नफा दिला आहे. कोचीन शिपयार्डच्या शेअर्सच्या किमतीमध्ये गेल्या तीन महिन्यांत शेअर बाजारात 48% ने लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीला मागील वर्षीच्या जून तिमाहीत 42.18 कोटींचा नफा झाला होता. तर या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 98.65 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
तीन दिवसात 40% वाढ
बुधवारी शेअरबाजार बंद होताना कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये जवळपास 17 टक्क्यांची वाढ होऊन शेअर 807 रुपयांवर पोहोचला. तर गुरुवारी कोचीन शिपयार्डच्या शेअर्सनी 11.97 टक्क्यांनी वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर 904.45 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. कंपनीच्या शेअर्समध्ये तीन दिवसात एकूण 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लि.कंपनीच्या मतानुसार जहाज बांधणी क्षेत्राला पुढील दोन ते चार वर्षांमध्ये 1.2 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीचे टेंडर मिळण्याची शक्यता आहे.