Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone कंपनीच्या CEO चा पगार कंपनीने का कापला?

Tim Cook

Image Source : www.macrumors.com

iPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.

नवीन वर्षात (2023) अॅपल कंपनीत (Apple Inc.) कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगार आणि इतर मोबदल्यांची पुनर्रचना (Pay Revision) केली जात आहे. पण, यामध्ये सगळ्यात धक्कादायक पगार कपात खुद्द सीईओ टिम कूक (Tim Cook) यांच्या वाट्याला आली आहे. आणि कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शेअर होल्डर आणि टिम कूक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ही कपात करण्यात आलीय.    

पण, कंपनीची पुढील वर्षातली कामगिरी गृहित धरुन कंपनीच्या शेअरमधला त्यांचा वाटा 50% वरून 75% वर आणला जाणार आहे. तरीही 2023 चा टिम कूक यांचा पगार कमीच असेल, असं ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. 2022 मध्ये कूक यांना एकूण 99.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका मोबदला मिळाला. यात 30 लाख अमेरिकन डॉलर हा त्यांचा पगार होता. तर इतर 8.3 कोटी अमेरिकन डॉलर त्यांना कंपनीच्या समभागांच्या रुपात मिळाले. 2021 मध्ये त्यांना 98.7 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका पगार मिळाला होता.    

पण, आता जो समझोता कंपनी, शेअर होल्डर आणि टिम कूक यांच्यामध्ये झालेला आहे त्यानुसार, कूक यांना वर्ष 2023 मध्ये 5 कोटी अमेरिकन डॉलर इतकाच मोबदला मिळेल. स्वत: टिम कूक यांनी पगार कपातीची शिफारस केली होती, असं अॅपल कंपनीने म्हटलं आहे. पण, अशी शिफारस कूक यांनी का केली?    

कूक यांचा पगार का कमी करण्यात आला?   

अमेरिकेतली एक अव्वल टेक कंपनी असलेली अॅपल आपल्या कर्मचाऱ्यांना चांगला पगार देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण, इन्स्ट्यिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेस या अमेरिकेतल्या एका मोठ्या गटाने कंपनीच्या पगार विषयक रणनितीवर सातत्याने टीका केली होती. कंपनीची शेअर बाजारातली कामगिरी कशी आहे यावरून शेअरमध्ये दिला जाणारा मोबदला ठरला पाहिजे असं त्यांचं पहिलं म्हणणं होतं.    

आणि सीईओला मिळणारा मोबदला कंपनीच्या कामगिरीच्या विपरित आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कूक निवृत्त झाल्यानंतरही शेअरच्या स्वरुपात मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम त्यांना उपयोगी येईलच. अशावेळी मोबदला अवाजवी जास्त आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.    

याच वादामुळे मागच्या वर्षी अॅपल कंपनीला सीईओ आणि इतर मोठ्या पदांवरच्या व्यक्तींना दिला जाणाऱ्या पगारासाठी समभागधारकांकडून परवानगी घ्यावी लागली होती. यावेळी मात्र स्वत: टिम कूक यांनी पगार कपातीची शिफारस कंपनीकडे केली. आणि कंपनीने ती मान्य केली आहे. 2023 मध्ये टिम कूक यांना 4.9 कोटी अमेरिकन डॉलर इतका मोबदला मिळेल. आणि यात 30 लाखांचा पगार, 60 लाखांचा बोनस आणि इतर रक्कम समभागांच्या स्वरुपात असेल.