Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata small cap fund: टाटा स्मॉल कॅप फंडात 1 जुलैपासून गुंतवणूक बंद, कंपनीनं काय सांगितलं?

Tata small cap fund: टाटा स्मॉल कॅप फंडात 1 जुलैपासून गुंतवणूक बंद, कंपनीनं काय सांगितलं?

Tata small cap fund: टाटा म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या स्मॉल कॅप फंडात आता पैसे गुंतवता येणार नाहीत. कंपनीनं 1 जुलै 2023पासून टाटा स्मॉल कॅप (TSC) फंडातल्या एकरकमी रक्कम स्वीकारणं आणि गुंतवणूक करणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

फंड हाऊसनं यासंदर्भात माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं, की सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) आणि सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन्स (STPs) या माध्यमातून गुंतवणूक स्वीकारणं सुरू ठेवणार आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे, असं मालमत्ता व्यवस्थापन कंपनीनं (Asset management company) म्हटलं आहे. टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटमध्ये बँकिंग, अल्ट्रानेट प्रॉडक्ट्स अँड प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीचे बिझनेस हेड आनंद वरदराजन यांच्या मते, फंडाची कामगिरी तर चांगली होती. मात्र स्मॉल कॅप्सच्या तरल स्वरूपामुळे डिप्लॉयमेंटला वेळ लागतो. कारण त्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते.

'...तर गुंतवणुकीचा उद्देश नष्ट होईल'

वरदराजन पुढे म्हणाले, की शेअर्सना चेस केल्यानं किंमती वाढू शकतात. याचा परिणाम गुंतवणुकीवर होऊन गुंतवणुकीचा उद्देश नष्ट होईल. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा चांगला अनुभव मिळावा, अशी कंपनीची इच्छा आहे. सामान्यतः फंड हाऊसेस योजनांच्या सदस्यत्वावर बंदी घालतात, जेव्हा त्यांना रोख गुंतवणूक करण्याची पुरेशी संधी मिळत नाही. ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कायम ठेवण्यासाठी आणि विद्यमान गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा दृष्टिकोन वापरला जातो.

पुढे काय?

फंड हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार, टाटा स्मॉल कॅप फंडातल्या एकरकमी आणि स्विच-इन इन्व्हेस्टमेंट 30 जून 2023च्या कट ऑफ वेळेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. त्यानंतर, गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकणार नाहीत. या काळात सर्व सध्या सुरू असलेल्या एसआयपी आणि एसटीपी चालू राहतील. गुंतवणूकदार नवीन नोंदणीदेखील करू शकणार आहेत. स्कीम बदलणं किंवा बाहेर पडणं यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

एसआयपी एक चांगला पर्याय

विद्यमान गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की ज्यांना विकासाच्या संधींबद्दल सकारात्मकता आहे, त्यांनी गुंतवणूक करत राहावी. मात्र नवीन भांडवल टाकण्यासाठी निर्बंध उठेपर्यंत प्रतीक्षा करणं फायद्याचं राहील. गुंतवणूकदारांना एसआयपीचाही एक चांगला पर्याय आहे.

टाटा स्मॉल कॅप फंडाविषयी?

  • नोव्हेंबर 2018मध्ये लॉन्च केलेला टाटा स्मॉल कॅप फंड 86 टक्के गुंतवणूक देशांतर्गत इक्विटीमध्ये करतो. त्यापैकी 65 टक्के स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये आणि उर्वरित डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स आणि आरईआयटी तसंच इनविट्सशिवाय लार्ज आणि मिड कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.
  • या स्कीमला चंद्रप्रकाश पडियार आणि सतीश चंद्र मिश्रा मॅनेज करतात.
  • फंडानं मागच्या तीन वर्षांत 43 टक्के परतावा दिला आहे आणि 4400 कोटी रुपयांची मालमत्ता अंडर मॅनेजमेंट (Asset Under Management) आहे. मोठ्या गुंतवणुकीमुळे आणि विलंबामुळे योजनेतला रोख रकमेचा वाटा 14 टक्क्यांवर गेला आहे.

स्मॉल कॅप फंडात मोठी गुंतवणूक

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) डेटानुसार, परताव्यासाठी गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंडांकडे अधिक आकर्षित होतात. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये इक्विटी-केंद्रित योजनांच्या 1.46 लाख कोटींच्या नेट फ्लोपैकी स्मॉल कॅप फंडांचा वाटा 15.1 टक्के किंवा 22,104 कोटी रुपये इतका होता. हा कल चालू आर्थिक वर्षातही कायम आहे. एप्रिल आणि मे 2023मध्ये 9721 कोटी रुपये नेट फ्लोपैकी 5465 कोटी रुपये स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवले गेले आहेत.