Tax Saving Tips: केंद्र सरकारचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडून झाला आहे. सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी टॅक्सचे नवीन नियम ही जाहीर केले आहेत; ते 1 एप्रिल पासून लागू होतील. तुम्ही नोकरी करत असाल तर कंपन्यांकडून तुमच्याकडे गुंतवणुकीचे पुरावे मागितले जातील. ते वेळेत जमा करा. टॅक्सचे पुरावे तुमच्याकडे यावेळी नसतील तर पुढील वर्षाची सुरूवात आजपासूनच नियोजनाने सुरू करा. यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये करता येऊ शकेल आणि तुम्हाला टॅक्ससुद्धा लागणार नाही.
ELSS फंडमुळे टॅक्स सेव्हिंगसह संपत्तीत वाढ होईल
चांगला परतावा आणि टॅक्समध्ये सवलत मिळवून देणारी योजना म्हणून ELSS ही एक चांगली योजना मानली जाते. या योजनेने आतापर्यंत 12 ते 14 टक्क्यांपर्यंत परतावा (Return) दिला आहे. याचा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो. 3 वर्षानंतर गुंतवणूकदार यातून बाहेर पडू शकतो किंवा या योजनेतून पैसे काढू शकतो. ईलएसएस (ELSS)मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. या कलमांतर्गत गुंतवणूकदाराला 1.5 लाखापर्यंतचा लाभ मिळतो. इतर टॅक्स सेव्हिंग स्किमच्या तुलनेत ELSS मधून चांगले रिटर्न मिळतात, असे म्युच्युअल फंडमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एकरकमी आणि एसआयपीद्वारे करू शकता गुंतवणूक
फायनान्शिअल तज्ज्ञांच्या मते, ईएलएसएस स्कीममध्ये कमीतकमी 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. यामध्ये गुंतवणूक करण्यावर काही बंधने नाहीत. गुंतवणूकदार एकरकमी किंवा एसआयपी (Lumpsum or SIP)द्वारे यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या स्कीममधून टॅक्स सवलतीसह गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. 3 वर्षानंतर तुम्ही जर या योजनेमधून पैसे काढत असाल तर दीर्घकालीन भांडवली नफा टॅक्स (Long Term Capital Gains Tax-LTCG) अंतर्गत 10 टक्के टॅक्स आकारला जातो. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही या योजनेतून 3 वर्षांच्या आत पैसे काढता येत नाहीत.
मनीकंट्रोल या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, टॉप टॅक्स सेव्हिंग फंड कंपन्यांनी 3 वर्षांत किमान 18 टक्के आणि कमाल 36 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यामध्ये पराग पारेख टॅक्स सेव्हर फंड (Parag Parikh Tax Saver Fund), एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंड (HDFC Tax Saver Fund), क्वांट टॅक्स प्लॅन (Quant Tax Plan), आयडीएफसी टॅक्स ॲडव्हॅनटेज फंड (IDFC Tax Advantage Fund), युटीआय मास्टर इक्विटी प्लॅन (UTI Master Equity Plan) आणि एसबीआय लॉन्ग टर्म इक्विटी (SBI Long Term Equity) यांचा समावेश आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स /म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)