Infosys Q4 Result: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने काल (गुरुवार) चौथ्या तिमाहीचे (FY23) निकाल जाहीर केले. मात्र, या निकालाने गुंतवणूकदारांची निराशा केली. भांडवली बाजारातील विश्लेषक आणि वित्तीय संस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार नफ्याची आकडेवारी आली नाही. दरम्यान, इन्फोसिसची नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण (Attrition rate) कमी झाले. तसेच चालू आर्थिक वर्षात कंपनीकडे मोठी कंत्राटे असल्याची सकारात्मक बाब निकालातून समोर आली. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी साडेतीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कपात केल्याचेही निकालातून स्पष्ट झाले.
वार्षिक नफा 16 टक्क्यांनी वाढला
Q4 मध्ये इन्फोसिसने 6,128 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. कराची रक्कम वजा केल्यानंतरचा हा आकडा आहे. तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत नफा 16% नी कमी झाला. मात्र, वार्षिक आकडेवारीचा विचार करता कंपनीचा नफा 6 टक्क्यांनी वाढला. तसेच ऑपरेशन्स विभागातून मिळणाऱ्या नफ्यात 2.2 टक्क्यांची घट झाली. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत ऑपरेशन्स विभागाचा नफा 16 टक्क्यांनी वाढला. काल कंपनीची शेअर्सची किंमत 1388 होती. निकाल जाहीर होण्याआधी शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी खाली आले होते.
इन्फोसिसमध्ये सुमारे साडेतीन लाख कर्मचारी
चौथ्या तिमाहीची वार्षिक (YoY) वाढ 8.8% आहे. 2021-22 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपेक्षा ही आकडेवारी चांगली आहे. चौथ्या तिमाहीत कॅश फ्लो 95.3% राहिला. तसेच 31 मार्च 2023 नुसार कंपनीत 3,43,234 कर्मचारी आहेत. सोमवारी शेअर बाजार सुरू होईल तेव्हा इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खाली जातील, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जात आहे. मार्च तिमाहीत इन्फोसिसने एकूण 2.1 बिलियन डॉलर किंमतीची कंत्राटे मिळवली. तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 9.8 बिलियन डॉलरची कंत्राटे मिळवली.
भागधारकांना डिव्हिडंड किती?
तिमाहीचा निकाल जाहीर करतानाच इन्फोसिसने समभागधारकांना लाभांश (डिव्हिडंड) जाहीर केला. प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश इन्फोसिसने जाहीर केला. 2023 आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 34 रूपये लाभांश जाहीर केला. आर्थिक वर्ष 22 च्या तुलनेत लाभांश वाढीची टक्केवारी 9.7% आहे.
इन्फोसिसचा नफा 3 ते 5 टक्क्यांनी कमी झाल्याचे वित्तीय संस्थांचे म्हणणे आहे. या निकालाचे पडसाद पुढील आठवड्यात बाजार सुरू झाल्यानंतर दिसू शकतात. नुकतेच टीसीएस कंपनीनेही आपले तिमाही निकाल जाहीर केले. इन्फोसिसच्या तुलनेत टीसीएसचे निकाल चांगले आले. मात्र, शेअर बाजारावर फार काळ परिणाम झाला नाही. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीसीएसचे शेअर्स खाली आले होते. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी निराशा केली तर त्याचा परिणाम शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणावर होईल. इतरही कंपन्या एप्रिल महिन्यात आपले रिपोर्ट कार्ड सादर करणार आहेत.