Infosys Founder Narayana Murthy: देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस सुरू करणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी तिरुमला तिरुपती देवस्थान येथे दर्शन घेतले. तेथे त्यांनी सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मूर्ती दान केली. या दोघांचे वजन सुमारे 2 किलो आहे. सुधा मूर्ती या आधी तिरुपती बालाजी मंदिराच्या ट्रस्टच्या सदस्याही होत्या. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दान केलेले शंख आणि कासवाची मूर्ती तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे सदस्य ईओ धर्मा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केली.
2 किलो सोने दान
मूर्ती दांपत्याने दान केलेला सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती खूप खास आहे. या दोन्हीची रचना विशेष अशी करण्यात आली आहे. या दोन्हींचा उपयोग स्वामी अम्मावार यांच्या अभिषेकात केला जातो. मूर्ती दाम्पत्याच्या या दानाला 'भूरी' दान असेही म्हणतात. सध्या बाजारात सोन्याची सरासरी किंमत 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दान केलेल्या सोन्याच्या शंख आणि कासवाच्या मूर्तीचे वजन सुमारे 2 किलो आहे. यावरुन या दोन्ही वस्तूंची किंमत 1.50 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
हिंदू धर्म ग्रंथावर विश्वास
देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे भगवद्गगीतेपासून प्रचंड प्रेरीत आहेत, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच महाभारतातील त्यांच्या आवडत्या पात्रा बद्दल देखील ते बोलले होते. 'महाभारतातील ज्या पात्राने मला सर्वात जास्त प्रेरणा दिली ते म्हणजे कर्ण आहे आणि त्यांच्याच कडून प्रेरणा घेत मी मोठा झालो आहे', असे नारायण मूर्ती यांनी एका कार्यक्रमा दरम्यान म्हटले होते.
दानाचे महत्व
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराला अनादी काळापासून देणगी मिळत आली आहे. मोठमोठे नेते, अभिनेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी या मंदिरात दर्शन घेण्यास जात राहतात. असेही मानले जाते की, अशा दानाने भगवान व्यंकटेश त्यांचे संकट दूर करतात.