Infosys Buyback Offer: भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys)ने बुधवारपासून (दि. 7 डिसेंबर) शेअर बायबॅक ऑफर सुरू केली. ही ऑफर 6 जून, 2023 पर्यंत सुरू असणार आहे. बायबॅक ऑफर अंतर्गत इन्फोसिस कंपनी 9300 कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेणार आहे. इन्फोसिसने शेअर बायबॅक (Share Buyback) ऑफर सुरू केल्यानंतर इन्फोसिसच्या शेअर्समध्ये खूप चढ-उतार दिसून आलेले नाहीत.
आठवड्यातील चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. 7 डिसेंबर) इन्फोसिसच्या शेअर्समध्ये साधारण वाढ होऊन तो 1610 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. तर गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) सकाळी 1605 रुपयांवर इन्फोसिस ओपन झाल्यानंतर मार्केट संपल्यानंतर तो 1620 रुपयांवर बंद झाला आहे. यादरम्यान काही ब्रोकरेज कंपन्या हा शेअर 1930 ते 1960 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला असून याकाळात गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे 300 रुपयांचा फायदा होऊ शकतो, अशा काही ब्रोकरेज कंपन्यांनी अंदाज वर्तवले आहेत.
इन्फोसिसची बायबॅक ऑफर काय आहे? What is Infosys' Buyback Offer?
इन्फोसिसची बायबॅक ऑफर ही 9300 कोटी रुपयांची असून ही ऑफर बुधवारपासून (दि. 7 डिसेंबर) सुरू झाली आहे. ऑफरच्या पहिल्याच दिवशी इन्फोसिसने अंदाजे 202 कोटी रुपये मूल्य असलेले शेअर्स विकत घेतले आहेत. इन्फोसिसची एकूण बायबॅकची ऑफर 5.02 कोटी इक्विटी शेअर्सपेक्षा अधिक असणार आहे. इन्फोसिसच्या ऑफरनुसार बायबॅकच्या प्रत्येक शेअरची किंमत 1850 रुपयांपेक्षा जास्त नसायला हवी.
बायबॅक ऑफर म्हणजे काय? What is Buyback Offer?
प्रत्येक कंपनीचा मुख्य उद्देश आपला व्यवसाय वाढवणे हाच असतो. यासाठी लागणारे भांडवल कंपनी अनेक मार्गांद्वारे जमा करत असते. या अनेक मार्गांमध्ये प्रमुख मार्ग म्हणजे कंपनीच्या काही भागाची मालकी लोकांना एका ठराविक दरात विकणे. यालाच कंपनीचे शेअर्स विकणे (Company Share) असे म्हटले जाते. हे शेअर्स स्टॉक एक्सचेंज मध्ये आयपीओ (IPO - Initial Public Offering) या प्रक्रियेद्वारे विकले जातात. लोकांनी हे शेअर्स विकत घेतल्यानंतर ते कंपनीच्या ठराविक भागाचे मालक बनतात. विकलेल्या या शेअर्समधून मिळालेले पैसे कंपनी अनेक नव्या उपक्रमांसाठी व कंपनीच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरते. कंपनीच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपला विकलेला भाग म्हणजेच शेअर्स लोकांकडून पुन्हा खरेदी करू शकते. या शेअर्स खरेदीच्या प्रक्रियेलाच बायबॅक (buyback) म्हणजेच परत खरेदी (शेअर पुनर्खरेदी) असे म्हटले जाते.
इन्फोसिसच्या बायबॅक ऑफरचा लाभ कसा घ्यायचा? How to participate in Buyback Offer?
ज्या गुंतवणूकदारांकडे इन्फोसिसचे शेअर्स डीमॅट खात्यात आहे; तो गुंतवणूकदार या बायबॅक ऑफर्समध्ये सहभागी होऊ शकतो. फक्त ज्या गुंतवणूकदारांना बायबॅक ऑफर अंतर्गत शेअर्स विकायचे आहेत. त्या गुंतवणूकदारांनी आपल्या ब्रोकरला कळवणे गरजेचे आहे. कारण कंपन्या जेव्हा बायबॅक स्कीम अंतर्गत शेअर बाय करण्याची ऑर्डर देते तेव्हा ब्रोकर सेल ऑर्डर देत असतो. त्यामुळे याबाबतची प्राथमिक माहिती घेऊन कोणीही बायबॅक ऑफरमध्ये सहभागी होऊ शकतो.