माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीची TIME मॅगझीनने दखल घेतली आहे. TIME मॅगझीनने निवडलेल्या जगातील 100 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही भारतातील एकमेव कंपनी आहे.
TIME मॅगझीनने नुकताच जगातील 100 सर्वोत्कृष्ट कंपन्यांची यादी जाहीर केली. यात मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अल्फा, मेटा या टेक कंपन्या पहिल्या चार स्थानांवर आहेत. TIME मॅगझीनच्या यादीत इन्फोसिसला 64 वे स्थान देण्यात आले आहे. TIME मॅगझीनमध्ये झळकणारी इन्फोसिस ही एकमेव भारतीय कंपनी आहे.
TIME मॅगझीनने कर्मचाऱ्याचे समाधान, महसुली वृद्धी आणि शाश्वत विकास या मापदंडाच्या माध्यमातून जगभरातील 100 टॉप कंपन्यांची निवड केली. यात भारतातून केवळ इन्फोसिस कंपनीला स्थान देण्यात आले आहे.
इन्फोसिस 58 देशांमध्ये कार्यरत आहे. कंपनीकडे 3 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. मागील तीन वर्षात इन्फोसिसने व्यावसायिक वृद्धीचा धडाका कायम ठेवला. वर्ष 2022 मध्ये कंपनीने 100 मिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला.
आयटी कंपन्यांच्या श्रेणीत देखील इन्फोसिसने दमदार कामगिरी केली आहे. प्रोफेशनल सर्व्हिस श्रेणीत इन्फोसिस आघाडीच्या तीन कंपन्यांमध्ये आहे. त्याखाली अॅसेंचर चौथ्या स्थानी आणि डेलॉइट 36 व्या स्थानी आहे.
सात इंजिनिअर्सनी स्थापन केली इन्फोसिस
1981 मध्ये नारायण मूर्ती यांच्यासह सहा इंजिनिअर्सनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली होती. आजच्या घडीला इन्फोसिस भारतातील दुसरी मोठी आयटी कंपनी आहे. कंपनीमध्ये 3 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात.
पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढला
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत इन्फोसिसला 5945 कोटींचा नफा झाला होता. कंपनीच्या नफ्यात 11% वाढ झाली होती. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 5360 कोटींचा नफा झाला होता. यंदाच्या तिमाहीत कंपनीला विक्रीतून 37933 कोटींचा महसूल मिळाला. महसुलात 10% वाढ झाली होती.