पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या सततच्या दरवाढीनंतर आता पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रूपयांनी वाढ केली आहे. 7 मे रोजी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी (LPG Gas Cylinder) अधिकचे 50 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे एका घरगुती गॅसच्या बाटल्यासाठी सर्वसामान्यांना 1 हजार रूपये (999.50 रूपये) मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजपासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.
यापूर्वी 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रूपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी 14.2 किलोच्या गॅस सिलेंडर बाटल्याची किंमत 949.50 रूपये झाली होती. आज पुन्हा त्यात 50 रूपयांनी वाढ केल्याने या बाटल्याची किंमत 1 हजार रूपये (999.50 रूपये) झाली आहे. व्यावसायिक वापराच्या 19 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत 1 मे रोजी 102.50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे या सिलेंडरची किंमत 2355.50 रूपये झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचा फटका खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होऊ शकतो.
Image source -https://bit.ly/3ysGNia