भारतातील फार्मा उद्योगाची वाढ वेगाने होत आहे. सोबतच महागाई आणि कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे औषधेही महागली आहे. औषधे निर्यात करणारा भारत एक महत्त्वाचा देश आहे. कोरोना काळात भारताने अनेक देशांना वैद्यकीय उपकरणे औषधे निर्यात केली होती. या काळात देशांतर्गतही फार्मा उद्योगाची उलाढाल वाढली होती. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये भारतीय फार्मा उद्योगाची 8 टक्के दराने वाढ झाली. मागील वर्षात फार्मा उद्योगाची एकूण उलाढाल 1.8 लाख कोटी रुपये झाली, असे AWACS रिसर्च या संस्थेचे म्हणणे आहे.
2021 साली भारतीय फार्मा उद्योगाचा विकास 14.9 टक्के दराने झाला होता. मात्र, यामागे कोरोना हे महत्त्वाचे कारण होते. या काळात, अँटी इन्फेक्टिव्ह, व्हिटामिन, श्वसनाचे आजार, ताप आणि वेदनाशामक गोळ्या या औषधांचा सर्वात जास्त समावेश होता. अँटी इन्फेक्टिव्ह औषधांमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीफंगल औषधांची 2021 वर्षात 25 टक्के दराने वाढ झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव नाहीसा झाल्याने या गोळ्यांची विक्रीही घटली आहे. 2022 वर्षात अँटी इन्फेक्टिव्ह औषधांची सर्वात जास्त विक्री झाली. याची एकूण किंमत 22 हजार 531 कोटी रुपये होती.
हृदयरोग संबंधित औषधे आणि गोळ्यांचा फार्मा उद्योगातील एकूण वाटा 13 टक्के आहे. यामध्ये 2022 साली 8 टक्के वाढ झाली. पोटाचे विकार आणि त्यासंबंधित औषधांच्या विक्रीत 10 टक्के वाढ झाली. मधुमेह आजारावरील औषधांच्या विक्रीत 6 टक्के वाढ झाली. श्वसनासंबंधित औषधांची विक्री 19 टक्क्यांनी वाढली.
भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राला सर्वात जास्त महत्त्व आले होते. भारताने या काळात वैद्यकीय उपकरणे, कोरोना लस आणि औषधे गरजू देशांना निर्यात केली होती. आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारभावही वाढले होते. चीनकडून API या कच्च्या मालावर भारत अवलंबून होता. मात्र, कोरोना आणि भारत चीन सीमेवरील वादामुळे चीनमधून होणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. आता भारताने API म्हणजेच अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंनग्रेडियंट निर्मितीसाठी धोरण आखले असून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.