IMF Urges Central Govt To Lift Ban: भारताने 20 जुलै 2023 रोजी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि त्यानंतर सोशल मिडीयाव परदेशातील तांदळाच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे होणारे हाल दिसू लागले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा मध्ये तांदूळ खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. तर अनेक नागरिक तांदळाचा अतिरिक्त साठा करुन ठेवत असतांनाचे दृश्य आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तांदळाच्या किमती वाढायला लागल्या आहेत. या सर्व गोष्टींची दखल घेतांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) केंद्र सरकारला बिगर बासमती तांदळावरील बंदी उठवण्याची विनंती केली आहे.
निर्यात उठविण्याची ‘आयएमएफ’ची मागणी
तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे जगभरातील नागरिकांना अन्नाच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी भारतातून निर्यातीवर बंदी उठवण्याची विनंती केली आहे. कारण अशा प्रकारच्या बंदीमुळे जगभरातील खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, बॉईल केलेले बिगर बासमती तांदूळ आणि बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारने अद्याप कुठलीही बंदी घातलेली नाही, हे विशेष.
निर्यातीत भारताचा महत्वाचा वाटा
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जगभरात तांदूळ निर्यात करण्यामध्ये भारताचा 40 % वाटा आहे. परंतु देशाअंतर्गत तांदळाच्या किंमतीमध्ये देखील सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. तसेच, जे टोमॅटोच्या बाबतीत घडले ते जर का तांदळाच्या बाबतीत घडले तर त्याचा फटका सरकारला 2024 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये बसणार. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
अल-निनोमुळे आणखी किमती वाढणार
भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा करताच जागतिक बाजारपेठत तांदळाच्या किमती झपाट्याने वाढल्या. यावर्षी देशात असलेल्या अल-निनो चा प्रभाव तांदळाच्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात तांदळाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.