जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे भारताची स्टील निर्यात 54 टक्क्यांनी घटली आहे. तयार स्टीलची मागील वर्षातील एप्रिल-डिसेंबर महिन्यातील आकडेवारी समोर आली असून यातून निर्यातीत ५४ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.
जागतिक बाजारपेठांमध्ये स्टीलची मागणी कमी झाल्याने निर्यात घटली आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ५४ टक्क्यांनी मागणी कमी होऊन ४.७४ मिलियन टनपर्यंत खाली आहे. निर्यात करातील बदलामुळे कंपन्यांना शिपमेंट करण्यामध्ये अडचणी येत आहेत. मागील वर्षी मे महिन्यात आठ स्टील संबंधित वस्तूंवरील निर्यात कर १५ टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. रशिया युक्रेन युद्धामुळे स्टीलची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र, अतिरिक्त करामुळे निर्यात कमी झाली.
मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान, स्टीलचे उत्पादन ५.७ टक्क्यांनी वाढून ८९.९ मिलियन टन झाले तर वापर ११.५ टक्क्यांनी वाढून ८५.५ मिलियन टन झाला. याच काळात भारताने ४.४ मिलियन तयार स्टील परदेशातून आयात देखील केले. कच्च्या लोखंडाचे उत्पादनही ५ टक्क्यांनी वाढले.
टाटा, वेदांता, जेएसडब्ल्यू, जिंदाल, हिंदाल्को, SAIL या भारतातील प्रमुख स्टील उत्पादक कंपन्या आहेत. कच्चे लोखंड तयार करणारा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. २०२१ साली भारताने ११८ मिलियन टन कच्चे लोखंड निर्मिती केली होती. Iron ore (आयर्न ओर - खाणीतून काढलेले कच्चे लोखंड) आणि स्वस्त मजुर उपलब्ध असल्याने भारतातील स्टील उद्योगाचा विकास झाला आहे.