गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्था एक दमदार अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. जगभरातील विकसित देश सध्या आर्थिक मंदीचा सामना करत असताना भारतात मात्र सर्व काही सुरळीत चालू आहे. देशातील आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील धोरणं यामुळे हे शक्य झाले असल्याचे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की जागतिक आव्हानांमध्ये भारत आणि त्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल ते पूर्वीपेक्षा अधिक आशावादी आहेत.
डिजिटलायझेशन कौतुक
जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजय बंगा हे पहिल्यांदाच भारतात आले आहेत. भारतभेटीत त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने भारत सरकारच्या पुढाकाराचे कौतुक केले. ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्पाअंतर्गत गावाखेड्यात टेलिकम्युनिकेशन सेवा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, याअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा प्रदान करण्याची सरकारची योजना आहे.
देशात 5 G नेटवर्क सेवा सुरु झाल्याने त्याचा थेट परिणाम आता अर्थव्यवस्थेवर देखील पाहायला मिळणार आहे. याआधीच देशभरात 4G सेवा कार्यरत आहे. यामुळे देशभरातील करोडो नागरिक मोबाईलच्या माध्यमातून UPI पेमेंट करू लागले आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेत कमालीचे बदल झाल्याचे अजय बंगा यांनी म्हटले आहे.
अजय बंगा यांनी सोमवारी येथे झालेल्या G-20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या (FMCBG) गव्हर्नरांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती दिली. FMCBG च्या तिसर्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले अजय बंगा यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीत आहे. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करून, बंगा म्हणाले की, डिजिटल पायाभूत सुविधांसाठी भारत सरकारने विकसित केलेले मोबाईल अॅप्स आज लोकांचे जीवन सोपे करत आहेत.
पुढील वर्ष आव्हानात्मक
पुढील आर्थिक वर्ष हे संपूर्ण जगासाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल असे बंगा यांनी म्हटले आहे. सध्या जगभरात असलेले आर्थिक मंदीचे सावट लक्षात घेता, जागतिक बाजारपेठेत उलथापालथ होऊ शकते. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) याआधीच याची कल्पना दिली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वांनीच विशेष काळजी घ्यायला हवी असे देखील त्यांनी म्हटले आहे.