कोरोनामुळे सेवा क्षेत्राला आलेली मरगळ दूर झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हॉटेल, पर्यटन, ट्रॅव्हल सह एकंदर सेवा क्षेत्राला होणाऱ्या कर्जपुरवठ्यात 21.3% दराने वाढ झाली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 3.2% एवढे होते. भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या प्रभावातून बाहेर पडत असून कर्ज पुरवठ्यामधून या क्षेत्राची वाढ दिसत आहे. चालू आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपण्याआधी अनेक बँकाचा पत पुरवठ्याचा दर 'डबल डिजिट' असेल असे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनामुळे सेवा क्षेत्राचे नुकसान -
भारतामध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अनेक महिने लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. नागरिकांना घराच्या बाहेरही पडता येत नव्हते. अशा काळात, पर्यटन, प्रवास, हॉटेल आणि सेवा पुरवणारे सर्व उद्योगधंदे तोट्यात आले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्याने अनेक विमान कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. हॉटेल आणि पर्यटन पूर्णपणे बंद होते. मात्र, मागील वर्षापासून सेवा क्षेत्रातील उद्योगांना सरकारी आणि खासगी बँकांकडून मोठ्या प्रमाणात पतपुरवठा होत आहे. नवीन वर्षात सेवा क्षेत्राची चांगली वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेती, शेती संबंधित क्षेत्राला कर्जपुरवठा -
शेती आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योगांना होणाऱ्या कर्जपुरवठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत 13.8% वाढ झाली आहे. 2022 वर्षात या क्षेत्राला 10.9% कर्जपुरवठा झाला होता. त्याचबरोबर उद्योगांना 13.1% पतपुरवठ्यात वाढ झाली आहे. मागील वर्षी उद्योगांना फक्त 3.4% कर्जपुरवठा झाला होता. मोठ्या उद्योगांना होणाऱ्या कर्जपुरवठ्यात 10.5% कर्जपुरवठा वाढला आहे.
रिटेल क्षेत्राला पतपुरवठा कमी
मागील काही वर्षांमध्ये बँका रिटेल क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यास तयार नाही. रिटेल क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी सर्वच बँकांचे नियमही कठोर असल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यास बँका सहज तयार आहेत. मात्र, समतोल साधण्यासाठी आरबीआय धोरण आखण्यास सक्षम आहे, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. बँकांकडून होणाऱ्या वैयक्तिक कर्जपुरवठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 19.7% वाढ झाली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 12.6% वाढ झाली होती. बँकांकडून ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहनकर्ज मोठ्या प्रमाणात देण्यात आले.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            