India-France Deal: भारत आणि फ्रान्समध्ये पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्रातील मोठी डील होणार आहे. 90 हजार कोटींची राफेल विमानं आणि पाणबुड्या भारत फ्रान्सकडून खरेदी करणार आहे. याआधी फ्रान्सकडून 36 राफेल विमानं भारताने खरेदी केली आहेत. मात्र, नौदलाला आणखी सक्षम करण्यासाठी 26 राफेल आणि तीन स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्या भारत खरेदी करणार आहे.
संरक्षण मंत्रालयाची मंजूरी
डिफेन्स प्रॉक्युरमेंट बोर्ड (DPB)ने राफेल फायटर जेट आणि स्कॉर्पियन पाणबुडी खरेदीच्या कराराला मंजूरी दिली आहे. या आठवड्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचा दौरा करणार आहेत. त्याआधी या कराराची भारताने तयारी केली आहे.
सोमवारी संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये फायटर विमानं आणि पाणबुडी खरेदीच्या दोन करारांना मंजूरी दिली. Defence Acquisition Council द्वारे करारासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला जाणार आहेत. त्यावेळी या कराराची घोषणा दोन्ही देशांचे नेते करतील.
नौदल अधिक सक्षम होणार
26 राफेल एम विमानं खरेदी केल्यानं भारतीय नौदल आणखी सक्षम होणार आहे. भारताने यापूर्वी फ्रान्सकडून 36 राफेल विमानं खरेदी केली आहेत. या डीलचाही मोठा गाजावाजा झाला होता. टप्प्याटप्याने ही फायटर विमाने भारतात दाखल झाली होती. लष्करात सध्या मिग सह इतर अनेक जुनाट विमाने आहेत. ती बदलून नवी सामुग्री खरेदीवर भर देण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीत औपचारिक कराराला मान्यता देण्यात येणार आहे. मात्र, इतर तांत्रिक गोष्टी, पाणबुडी आणि विमानातील तंत्रज्ञान यावर नंतर वाटाघाटी होणार आहे. हा करार 90 हजार कोटींचा असणार आहे. भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे वापरता येतील, अशा पद्धतीने विमानाची आणि पाणबुडीची रचना करण्यात येणार आहे.