Seed Oil Production: देशातील तेलबिया उत्पादक शेतकर्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2 मिलियन टन सूर्यफूल तेलाच्या आयातीवर मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2023/24 साठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता सूर्यफूल तेल आयात करण्यासाठी नियमानुसार आयात शुल्क भरावे लागेल. देशांतर्गत तेलबिया शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, हा या निर्णयामागे उद्देश आहे.
ड्युटी फ्री सूर्यफूल आयात थांबवली
केंद्र सरकारकडून मागील वर्षीपासून 2 मिलियन टन कच्चे (क्रूड) सुर्यफूल तेल (Seed Oil Import) आयात केले जाते. मात्र, पुढील आर्थिक वर्षासाठीचा हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खाद्यतेलाची आयात करणारा भारत आघाडीचा देश आहे. रशिया आणि युक्रेन देशांकडून भारत सर्वाधिक सूर्यफूल तेल आयात करतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीतही अडथळे निर्माण झाले आहेत.
पाम तेलाची आयात वाढण्याची शक्यता (Palm Oil import may increase)
सरकारच्या या निर्णयामुळे पाम तेलाची आयात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर सूर्यफूल आयात करायचे असेल तर आयात शुल्क द्यावे लागेल. त्यामुळे आयात केलेल्या सूर्यफूल तेलाच्या किंमती वाढतील. त्याला पर्याय देशांतर्गत तयार खाद्यतेल ठरू शकते. मागील वर्षी मार्च महिन्यात ड्युटी फ्री तेल आयातीचा निर्णय सरकारने घेतला होता. पुढील वर्षीही हा निर्णय लागू राहणार होता. मात्र, त्यापूर्वी हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
ड्युटी फ्री सोयाबीन तेलाची आयात रद्द करण्याचा निर्णय यावर्षी सरकारने जानेवारी महिन्यात घेतला. भारत सोयाबीन तेल अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिकेतून आयात करतो. तर इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड देशातून भारत पाम तेलाची आयात करतो.
देशांतर्गत तेलबिया उत्पादन आणि उद्योग (Oil seed farming)
मागील महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात खाद्यतेल आयात आणि देशातंर्गत खाद्यतेल बिया उत्पादनाबाबत कोणतीही घोषणा केली नाही. सर्व कर, आयात शुल्क आणि नियम 'जैसे थे' ठेवले होते. त्यामुळे खाद्यतेल निर्मिती क्षेत्रातील उद्योगांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. खाद्यतेल आयात करणारा भारत एक मोठा देश आहे. भारतात पाम तेलाची परदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. मात्र, या आयातीमुळे भारतीयांची तेल सुरक्षा धोक्यात आल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे. देशी उद्यागोला उभारी देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.