भारताने ऑलिम्पिक (Olympic Host) यजमानपदाच्या दावेदारीसाठी ठोस पावलं टाकायला सुरुवात केली आहे. 2036 चं ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी केंद्रसरकार प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी स्पष्ट केलंय. गुजरातमधलं (Gujarat) अहमदाबाद हे शहर त्यासाठीचा एक पर्याय आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद (Ahmedabad) शहरात क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. आणि नवीन उभारणं शक्य आहे, असं केंद्रसरकारचं म्हणणं आहे.
‘2032 च्या ऑलिम्पिकपर्यंत यजमान कोण असणार हे ठरलेलं आहे. त्यानंतर 2036च्या ऑलिम्पिकसाठी भारतही एक दावेदार देश असेल. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (Indian Olympic Association) सर्वतोपरी सहकार्य करण्याची क्रीडा मंत्रालय आणि केंद्रसरकारची भूमिका आहे,’ असं अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
भारताने यापूर्वी आशियाई क्रीडास्पर्धा 1982 (Asian Games) आणि राष्ट्रकूल क्रीडास्पर्धा 2010 (Commonwealth Games) यांचं आयोजन केलं आहे. आणि सध्या जी-20 परिषदेच्या (G20) 200 ते 300 बैठका भारतात होणार आहेत. ते पाहता ऑलिम्पिक सारखी क्रीडास्पर्धा देशाला नक्की भरवता येईल असा विश्वास केंद्रसरकारला आहे.
‘सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक होणार आहे. त्यात भारताकडून एक सादरीकरण केलं जाईल. आणि ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताची तयारी कशी सुरू आहे, याची माहिती परिषदेत सदस्य देशांसमोर ठेवली जाईल,’ असं अनुराग ठाकूर टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले.
भारतीय जनता पार्टीने 2022च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात ऑलिम्पिक आयोजनाचा उल्लेख केला होता. आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्र्याकडून ऑलिम्पिक आयोजन आणि ते ही गुजरातमध्ये करण्याचं वक्तव्य झालं आहे.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत तयार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.