अगदी शेअर बाजाराचाही आढावा घेतला तर माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमध्ये वर्ष 2022 मध्ये 22% घट झाली आहे. म्हणजे निफ्टीचा आयटी इन्डेक्स 22%नी खाली आलाय. एकट्या शुक्रवारी (9 डिसेंबर) यात जवळ जवळ 6% घट झाली. आता नोमुरा या संशोधन कंपनीने पुढील आर्थिक वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मंदीचं सावट असेल असं भाकीत वर्तवलं आहे.
नोमुरा कंपनीनेही शेअर बाजाराचं उदाहरण देताना मुख्य आयटी कंपन्यांचे तिमाही आकडे मागची 2-3 वर्षं पुरेसे आकर्षक नाहीएत. त्यामुळे आताही कंपन्या गुंतवणूक आकर्षित करू शकतील का असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामागे महत्त्वाची काय कारणं आहेत ते बघूया…
- अमेरिकन बाजारातील मंदी - भारतीय माहिती-तंत्रज्ञान उद्योग हा प्रामुख्याने या क्षेत्रातील सेवा देणारा उद्योग आहे. त्यासाठी आपल्याकडे बहुतांश काम हे अमेरिकन आणि इतर प्रगत देशातल्या आयटी कंपन्या पाठवतात. पण, अलीकडे अमेरिकेतच चढे व्याजदर आणि त्यामुळे मंदीसदृश वातावरण आहे. अशावेळी तिथून येणारी कंत्राटं कमी झाली आहेत. त्याचा फटका भारतीय कंपन्यांना बसतोय.
- परदेशी बाजारात नोकर कपात - आणखी एक मुद्दा म्हणजे परदेशातील आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली नोकर कपात. मेटा कंपनीने अलीकडेच 11,000 कर्मचारी काढून टाकण्याचं सुतोवाच केलं आहे. याचा परिणाम नकळतपणे झिरपत भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही पडतो. मेटा सारख्या अमेरिकन कंपन्यात आपलं काम भारताकडून करून घेत असतात. हे कामही कमी होतं. त्यामुळे भारतातही येणाऱ्या दिवसांमध्ये नोकर कपात पाहायला मिळू शकते. टीसीएस या देशातल्या अग्रगण्य आयटी कंपनीने सप्टेंबर 2022 पासून नवीन नोकर भरती स्थगित केली आहे.
- कोव्हिड नंतरची शांतता - कोव्हिडच्या काळात देशात बऱ्याच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ऑनलाईन पेमेंट, विविध अॅप यांना चांगले दिवस आले. घरी राहून करता येण्यासारखा उद्योग असल्यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला चांगले दिवस होते. आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशात 227 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल फक्त आयटी क्षेत्रात झाली. तर याच कालावधीत नोकऱ्याही वाढून 50 लाखांपर्यंत पोहोचल्या. पण, कोव्हिड नंतर जगातली गणितं बदलत आहेत. आणि आयटी उद्योगालाही त्याच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे.