गेल्या काही वर्षांपासून देशातील स्मार्टफोनची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. देशांतर्गत वेगवगेळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनचे वाढलेले उत्पन्न, वाढलेली गुंतवणूक तसेच सरकारी योजनांमुळे या उद्योगाला मिळणारी गती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल-मे या दोन महिन्यांत 2.43 अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले आहेत. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक निर्यात आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला असता, गेल्या 2 महिन्यात भारतातून विविध देशांमध्ये होत असलेली मोबाईल फोनची निर्यात 157.82 टक्क्यांनी वाढली आहे. यात सर्वाधील स्मार्टफोनची निर्यात ही अमेरिकेला झाली आहे हे विशेष!
अमेरिका प्रमुख निर्यातदार
वाणिज्य मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी प्रकाशित केली आहे. या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत, म्हणजेच एप्रिल-मे 2023 या कालावधीत भारताकडून अमेरिकेला होत असलेल्या स्मार्टफोनची निर्यात तब्बल 781.22 टक्क्यांनी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत तब्बल 812.5 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या स्मार्टफोनची निर्यात केली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाची आकडेवारी बघता, भारतातून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोनची निर्यात ही 92.2 दशलक्ष डॉलर्स इतकी नोंदवली गेली होती. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार स्मार्टफोनच्या बाबतीत अमेरिका हा भारताचा प्रमुख निर्यातदार देश ठरला आहे. मूल्यानुसार भारतातून होणाऱ्या स्मार्टफोनच्या एकूण निर्यातीपैकी एक तृतीयांश वाटा अमेरिकेचा आहे.
अमरिका पाठोपाठ युनायटेड अरब अमिराती (UAE) दुसऱ्या क्रमांकावर आहे. UAE मध्ये 484.5 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे स्मार्टफोन निर्यात केले गेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नेदरलँड (Netherlands) असून, या देशात जवळपास 205 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे स्मार्टफोन निर्यात केले गेले आहेत. सोबतच 151.3 दशलक्ष डॉलर्सच्या निर्यातीसह युनायटेड किंगडम (United Kingdom) चौथ्या,136.6 दशलक्ष डॉलर्सच्या निर्यातीसह इटली (Italy) पाचव्या आणि 115.5 दशलक्ष डॉलर्सच्या निर्यातीसह झेक प्रजासत्ताक (Czech Republic) सहाव्या स्थानावर आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचा परिणाम
गेल्या काही वर्षापासून देशांतर्गत स्मार्टफोनचे उत्पादन वाढवावे यासाठी सरकारी स्तरावर वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार व्हावा, देशात वेगवगेळ्या कंपन्यांनी गुंतवणूक करावी, कार्काहणे सुरु करावेत यासाठी केंद्र सरकारने किचकट नियम व त्यातील तांत्रिक अडचणी सूर केल्या आहेत. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेमुळे जगभरातील मोबाईल उत्पादक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच आयफोन निर्माता कंपनी Apple ने भारतात उत्पादन सुरू करण्याच्या घोषणेनंतर आता भारत एक प्रमुख स्मार्टफोन हब म्हणून उदयास आला आहे.