Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Export : Iran ने भारताकडून चहा आणि बासमती तांदळाची आयात थांबवली  

भारत इराण निर्यात

भारत आणि इराण हे दोघं व्यापारी मित्र आहेत. म्हणजे उभय देशांदरम्यान कृषि आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा व्यापार चालतो. पण, नुकतीच इराणने भारताकडून होणारी चहा आणि बासमती तांदळाची आयात अचानक थांबवली आहे. का ते समजून घेऊया…

भारत आणि इराण दरम्यान कृषि मालाच्या (Agriculture Products) आयात-निर्यातीचं (Import-Export) कंत्राट दर आठवड्याला नव्याने करण्यात येतं. पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इराणने भारताकडून बासमती तांदूळ आणि चहाच्या आयातीचं कंत्राट अचानक आणि एकतर्फी रद्द केलंय. इराणकडून कंत्राट रद्द करताना कोणतंही अधिकृत कारण देण्यात आलेलं नाही.    

भारतीय निर्यातदारांच्या मते इराणमध्ये सुरू असलेलं हिजाबविरोधी आंदोलन आणि पर्यायाने तिथलं सरकारविरोधी वातावरण याला कारणीभूत असावं. तिथल्या आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आणि तांदूळ तसंच चहाला हॉटेल्स, बाजारपेठांमधून येणारी मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे ही आयात बंद झाली असावी असा अंदाज आहे.     

दुसरीकडे भारत आणि इराण दरम्यान सध्या रुपी ट्रेड (Rupee Trade) समन्वय करारावर काम सुरू आहे. तो शक्य झाला तर उभय देशांमध्ये होणारा व्यापार हा भारतीय चलन रुपयामध्ये करणं शक्य होणार आहे. हा करार लांबल्यामुळेही तिथले आयातदार खरेदीसाठी वेळ लावत असतील असा अंदाजही व्यक्त होत आहे.    

कारण काहीही असलं तरी भारतातल्या कृषि मालाच्या निर्यातीवर इराणच्या या निर्णयाचा नक्कीच परिणाम होणार आहे. कारण, वर्षभरात भारतातून साधारण 30-35 दशलक्ष किलो (Orthodox Tea) चहा इराणला निर्यात होतो. तर 1.5 दशलक्ष किलो बासमती तांदूळ निर्यात होत असतो.    

भारतीय व्यापाऱ्यांनी टी-बोर्डाला ही घडामोड कळवून इराणशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. बासमती तांदळाची इराणला निर्यात थांबली असली तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या भारतीय बासमती तांदळाला जगाच्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे तांदूळ निर्यातीवर फारसा परिणाम जाणवणार नाही, असा भारतीय निर्यातदारांचा अंदाज आहे.