भारतामध्ये आर्थिक वर्ष 2022 - 2023 मध्ये सर्वात जास्त आयात ही चीन मधुन केल्याचं वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या (Commerce and Industry Ministry) अहवालामधुन समोर आलं आहे. लडाख आणि अरूणाचल येथील सीमेवरील वादामुळे भारत-चीनच्या व्यापारावर मोठा परिणाम झालेला. चीनच्या सीमेवरील कुरापती नंतर केंद्र सरकारने चायना अॅपवर बंदी घातली होती. तसंच देशभरातून चायनाकडून कोणत्याच वस्तु आयात करु नयेत, थोडक्यात चायना सोबतचा व्यापार थांबवायचा अशी लहर होती. मात्र, देशाच्या विकासासाठी हे धोकादायक असून असा प्रत्यक्षात निर्णय घेता येऊ शकत नाही. त्यामुळे आजही चीनमधुन कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते.
दरम्यान, भारत आजही चीनकडूनच सगळ्यात जास्त कच्च्या मालाची आयात करतो ही वस्तुस्थिती आहे. जरी भारतामध्ये अनेकगोष्टीच्या उत्पादनांचा प्रयत्न केला जात असता तरी ते उत्पादन पुर्ण क्षमतेने सुरू झालेलं नाहीये. आणि सर्वच छोट्या छोट्या वस्तु या निर्मित करण्यासाठी वेळ व पैसा खर्ची करणं तार्किक नाही. त्यामुळे काही वस्तुंची वा कच्च्या मालाची आयात ही चीनकडून केली जातेयं. तरी भारताच्या प्रगतीचा वेग पाहता हा आयातीचा टक्का निश्चितच कमी होईल. असं मत उद्योग मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील व्यापार
2022 - 2023 या आर्थिक वर्षामध्ये भारताने चीनकडून 98.51बिलीयन डॉलर्सची आयात केलीये. या आयातीमध्ये 4.16 टक्क्यांची वाढ झालीये. तर भारताकडून चीनमध्ये 15.3 बिलीयनची निर्यात करण्यात आली आहे. दरम्यान या वर्षात भारताने सौदी अरेबियाकडून 7.45 टक्के तर अमेरिकेकडून 7.3 टक्के आयात केली आहे.
आयात कमी करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न
भारतातल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अधिकाधिक आयातीचं प्रमाण कमी करुन निर्यात कशी वाढवता येईल यासाठी सरकारने अनेक योजना वा उपक्रम सुरू केले आहेत.
आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, उत्पादन प्रोत्साहन अनुदान योजना (PLI Scheme) या माध्यमातून सरकार स्वदेशी निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताकडून आरोग्य क्षेत्रातील अनेक साहित्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली व सगळ्या जगभरात याचा पुरवठा केला गेला.
संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे अत्याधुनिक शस्त्रास्त्राची निर्मिती सुद्धा भारतात करण्याचे धोरण आखले आहे.
स्वदेशी उत्पादन निर्मितीसोबतच भारताकडून वेगवेगळ्या देशांतून कच्चा मालाची आयात करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार काही इलेक्ट्रोनिक वस्तु व खतांची आयात ही आता चीनच्या बदल्यात अन्य देशातून सुद्धा केली जातेय.
चीनमधून आयात करत असलेल्या वस्तू
भारत चीनकडून इलेक्ट्रोनिक वस्तुंचे सुटे भाग किंवा त्यासाठी लागणार कच्चा माल, चामडे, औषधं तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल, खतांसाठी लागणार कच्चा माल, मोठ्या मशिनच्या निर्मितीसाठी लागणारे विविध सुटे भाग, खेळणी, कपडे, होम अप्लायन्सेंस आणि लाईट्स अशा खूप साऱ्या वस्तु मागवल्या जातात. यामध्ये काही वेळा फक्त कच्चा मालाचा समावेश असतो तर कधी कधी पूर्ण तयार उत्पादनाची आयात केली जाते.